Home Breaking News एटापल्लीतील SBI बँक चोरी प्रयत्न प्रकरणातील आरोपी अटकेत,एटापल्ली पोलिसांना मिळाले यश…

एटापल्लीतील SBI बँक चोरी प्रयत्न प्रकरणातील आरोपी अटकेत,एटापल्ली पोलिसांना मिळाले यश…

1487

एटापल्लीतील SBI बँक चोरी प्रयत्न प्रकरणातील आरोपी अटकेत,एटापल्ली पोलिसांना मिळाले यश.

प्रतिनिधी आदित्य चिप्पावार एटापल्ली :

एटापल्ली येथील भारतीय स्टेट बँक शाखेत महिनाभराच्या कालावधीत दोन वेळा चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात एटापल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
दिनांक १६/१२/२०२५ ते १७/१२/२०२५ च्या मध्यरात्री अज्ञात आरोपीने एटापल्ली येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत खिडकीतून प्रवेश करून कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन व लॉकर फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, एटीएम व लॉकर फोडण्यात अपयश आल्याने कोणतीही रोकड चोरीस गेली नव्हती. या घटनेची नोंद पोलीस स्टेशन एटापल्ली येथे करण्यात आली होती.
या घटनेचा तपास सुरू असतानाच दिनांक ७/१/२०२६ ते ८/१/२०२६ च्या मध्यरात्री पुन्हा त्याच पद्धतीने अज्ञात आरोपीने बँकेत प्रवेश करून लॉकर फोडण्याचा प्रयत्न केला. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने एटापल्ली पोलीस प्रशासनाने या प्रकरणाकडे विशेष लक्ष दिले.
उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली व पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन एटापल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली. त्यातून आरोपीची ओळख पटविण्यात आली.
पोलीस पथकाने बिभास ऊर्फ संजु बच्चु हे (वय २३ वर्षे, रा. पीव्ही ९२, पाखांजूर, जिल्हा कांकेर, छत्तीसगड) यास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. अवघ्या २४ तासांच्या आत सदर गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीच्या अटकेमुळे एटापल्ली येथील SBI बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केलेले दोन्ही गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुळराज, तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. कार्तिक मधीरा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सदर कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली श्री. चैतन्य कदम, पोलीस निरीक्षक मच्छींद्र नागरगोजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोतीराम मडावी, पोउपनि गजानन साखरे, मपोउपनि रोहिणी गिरवलकर, मपोउपनि प्रतिक्षा वणवे तसेच पोलीस अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Don`t copy text!