Home Breaking News रेगडी येथे BSNL ची 2G सेवा वर्षभरापासून बंद; गोरगरीब नागरिकांना मोठा फटका…

रेगडी येथे BSNL ची 2G सेवा वर्षभरापासून बंद; गोरगरीब नागरिकांना मोठा फटका…

172

रेगडी येथे BSNL ची 2G सेवा वर्षभरापासून बंद; गोरगरीब नागरिकांना मोठा फटका

प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट
रेगडी :
चामोर्शी तालुक्यातील रेगडी गावात BSNL कंपनीचा मोबाईल टॉवर कार्यरत असतानाही मागील एक वर्षापासून BSNL ची 2G सेवा पूर्णतः बंद असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या हा टॉवर केवळ अँड्रॉइड मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांनाच उपयोगी ठरत असल्याचे चित्र असून साध्या मोबाईलधारकांसाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.
रेगडी परिसरात मोठ्या प्रमाणात गोरगरीब नागरिक, वृद्ध व्यक्ती व मजूर वर्ग वास्तव्यास असून बहुतांश नागरिक आजही साधे 2G मोबाईल वापरतात. मात्र 2G सेवा बंद असल्याने या नागरिकांना दैनंदिन संपर्क साधणे, आपत्कालीन परिस्थितीत फोन करणे तसेच शासकीय व बँकिंग व्यवहारांची माहिती घेणे कठीण झाले आहे. परिणामी गावात संपर्काचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे टॉवर असूनही सेवा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांमध्ये BSNL प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त होत आहे. “टॉवर असूनही सेवा नसेल तर त्याचा उपयोग काय?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
तरी BSNL च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रेगडी येथील 2G सेवा त्वरित सुरू करावी, जेणेकरून गोरगरीब व साध्या मोबाईलधारक नागरिकांना दिलासा मिळेल, अशी जोरदार मागणी रेगडीतील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Don`t copy text!