आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा : एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांची MSF मध्ये घवघवीत निवड – शहरात अभिनंदनाचा वर्षाव…

119

वरोरा | प्रतिनिधी : संकेत कायरकर
वरोरा येथील आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन येथील राष्ट्रीय छात्रसेना (एन.सी.सी.) विभागाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सेक्युरीटी फोर्स (MSF) मध्ये निवड होऊन महाविद्यालयाच्या नावाला राज्यस्तरीय गौरव मिळवून दिला आहे. गोपाल गायकवाड, प्रतीक बोढे, अनिकेत तामटकर आणि प्रज्वल मारेकर या चारही विद्यार्थ्यांची MSF मध्ये यशस्वी निवड झाल्याने वरोरा शहरात आनंदाचे वातावरण आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या मार्गदर्शक लेफ्टनंट संदीप पारखी सर यांचे शहरभरातून भरभरून कौतुक केले जात आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे सर, एन.सी.सी. विभाग आणि सातत्याने मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकवर्गाला दिले आहे.
विशेष म्हणजे, गोंडवाना विद्यापीठातून सर्वाधिक निवड आनंद निकेतन महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विद्यार्थ्यांची झाली असून, ही बाब महाविद्यालयाच्या शिस्तबद्ध प्रशिक्षण, नेतृत्वविकास आणि देशसेवेच्या मूल्यांची साक्ष देणारी ठरते. एन.सी.सी.मधील कठोर प्रशिक्षण, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि नेतृत्वगुण यामुळेच विद्यार्थ्यांना MSF सारख्या प्रतिष्ठित दलात संधी मिळाल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, कर्मचारी तसेच शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा संघटनांकडून विद्यार्थ्यांचे आणि लेफ्टनंट संदीप पारखी सरांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आनंद निकेतन महाविद्यालयाच्या या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना संरक्षण दलांमध्ये करिअर घडविण्यास नवी प्रेरणा मिळाली आहे.