अवैध बांधकाम प्रकरणात अजय कंकडालवार यांना तात्पुरता दिलासा; अहेरी न्यायालयाचा निर्णय मंगळवारी…

315

तालुका प्रतिनिधी आदित्य चिप्पावार

अहेरी नगर पंचायत कार्यालयालगत गडअहेरी मार्गावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी विकत घेतलेल्या भुखंडावरील सुरू असलेल्या अनधिकृत इमारत बांधकाम प्रकरणात न्यायालयीन घडामोडींना वेग आला आहे. अहेरी दिवाणी न्यायालयाने अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर, त्या आदेशाविरोधात दाखल केलेल्या अर्जावर अतिरिक्त सत्र न्यायालयाने कारवाईला मंगळवारपर्यंत स्थगिती देत तात्पुरता दिलासा दिला आहे.
कंकडालवार यांनी राज्य महामार्गालगत असलेल्या या भुखंडावर बांधकामाची परवानगी नगर पंचायतीकडे अर्ज करून मागितली होती. नियमांनुसार महामार्गालगत 20 मीटर किंवा रस्त्याच्या हद्दीपासून किमान 4.50 मीटर अंतर सोडणे बंधनकारक असतानाही, सादर केलेल्या बांधकाम प्लॅनमध्ये ते अंतर न पाळल्याचे आढळल्याने अहेरी नगर पंचायतीने परवानगी नाकारली. यापूर्वी नगर पंचायतीने सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून आवश्यक अंतराची अधिकृत माहितीही मिळवून घेतली होती.
परवानगी नाकारल्यानंतरही बांधकाम सुरूच ठेवल्याने आणि बांधकामात विविध अनियमितता आढळल्याने नगर पंचायतीने कंकडालवार यांना नोटीस, पोलीस तक्रार तसेच इमारत पाडण्याचे आदेश अशा कारवाया सुरू केल्या. स्थानिक पातळीवरील नाराजी आणि राजकीय विरोधाच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले.
कंकडालवार यांनी नगर पंचायतीच्या आदेशाविरोधात स्थगिती मागत अहेरी न्यायालयात याचिका दाखल केली होती. 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावण्यांनंतर मंगळवारपर्यंत कारवाई रोखण्याचा तात्पुरता आदेश न्यायालयाने दिला आहे.
आता या प्रकरणातील अंतिम निर्णय मंगळवारी होणार असून संपूर्ण अहेरी तालुक्याचे लक्ष कोर्टाच्या निर्णयाकडे लागले आहे.