आदिवासी विकास महामंडळाच्या दुर्लक्षामुळे 62 हजार पोत्यांपैकी हजारो पोती धान्य सडण्याच्या मार्गावर; शेतकऱ्यांचा उद्रेक…

102

तालुका प्रतिनिधी कवीश्वर मोतकुरवार

लाहेरी (ता. भामरागड) येथे आदिवासी विकास महामंडळाने मागील वर्षी खरेदी केलेले धान्य अजूनही गोडाऊनमधून उचलले गेले नसल्याने मोठ्या प्रमाणात धान्य सडण्यास सुरुवात झाली आहे. धान्याचे ठेवलेले ढिगारे पाहताना प्रथमदर्शनी मुरुम-मातीचा मोठा ढिगारा असल्याचा भास होतो; परंतु प्रत्यक्षात तो शेकडो शेतकऱ्यांच्या कष्टाचे धान्य आहे, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षी एकूण 66 हजार पोते धान्याची खरेदी करण्यात आली होती. त्यापैकी केवळ 4 हजार पोत्यांची उचल करण्यात आली असून तब्बल 62 हजार पोती अजूनही गोडाऊनमध्येच ढिगाऱ्याखाली दडली आहेत. या न उचललेल्या धान्यापैकी अंदाजे 15 ते 20 हजार पोती धान्य सडले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गोडाऊनमधील योग्य व्यवस्थापनाचा अभाव, तिरपालांची कमतरता, ओलावा व उष्णतेमुळे हजारो पोत्यांचे धान्य हानीग्रस्त होण्याची भीती वाढली आहे. धान्यावर बुरशी, किड व आर्द्रतेचे परिणाम दिसू लागले आहेत. एकीकडे सरकारकडून लाखो रुपयांचा खर्च करून धान्य खरेदी केली जाते, तर दुसरीकडे तेच धान्य बेवारस अवस्थेत सडत ठेवले जाते, ही दुर्दैवी बाब असल्याचे शेतकरी म्हणत आहेत.

शेतकरी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत म्हणतात—
“आम्ही अहोरात्र मेहनत करून पीक पिकवतो, विक्री केल्यानंतर पैसा मिळतो हे ठीक आहे; पण आम्ही तयार केलेले धान असेच सडत पडलेले पाहून मनाला मोठा धक्का बसतो. आमच्या रक्ताच्या थेंबाने पिकवलेले धान अशा प्रकारे वाया जात असल्याने वेदना होते.”

या प्रकरणाची चौकशी करून तातडीने धान्य उचल करण्याची मागणी शेतकरी व स्थानिक नागरिकांकडून होत आहे. धान्य नष्ट झाल्यास त्याची आर्थिक जबाबदारी कोण घेणार, असा सवालही ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

लाहेरी परिसरातील हा प्रकार संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला असून शेतकऱ्यांच्या मेहनतीचा आदर राखत प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.