प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट
रेगडी: चामोर्शी तालुक्यातील रेगडी गावातील नागरिकांनी आपल्या गावात बँक शाखा सुरू करण्याची मागणी केली आहे. गावातील लोकसंख्या वाढत असताना आर्थिक व्यवहार, शासकीय योजनांचे व्यवहार आणि महिला बचत गटांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र गावात कोणतीही बँक शाखा किंवा एटीएम सुविधा नसल्याने ग्रामस्थांना चामोर्शी किंवा घोट येथे जावे लागते.
दररोजच्या छोट्या व्यवहारांसाठी १५ ते ३५ किलोमीटरचे अंतर पार करावे लागते, त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढत आहेत. विशेषतः वृद्ध नागरिक, महिला, विद्यार्थी आणि शेतकरी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत रेगडी, स्वयं-सहायता बचत गट आणि स्थानिक व्यापारी वर्ग यांनी संयुक्तपणे बँक शाखा सुरू करण्याची मागणी केली आहे.
ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी सांगितले की, “रेगडी आणि आसपासच्या गावांची लोकसंख्या मिळून ४ ते ५ हजारांच्या दरम्यान आहे. येथे बाजारपेठ, शाळा,महाविद्यालय, पोलिस स्टेशन,पोस्ट ऑफिस यांसारख्या सुविधा आहेत. त्यामुळे बँक शाखा उघडल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.”
महिला बचत गटांच्या सदस्यांनीही या मागणीस पाठिंबा दर्शविला आहे. त्या म्हणाल्या, “आम्ही दरमहा बचत करून ती चामोर्शी किंवा घोट येथे जमा करतो. गावात शाखा उघडल्यास वेळ, खर्च आणि सुरक्षिततेचा प्रश्न सुटेल.”
ग्रामपंचायतीने शाखेसाठी जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली असून या मागणीवर लवकरच सकारात्मक निर्णय व्हावा, अशी अपेक्षा रेगडीतील नागरिकांनी व्यक्त केली आहे.







