एटापल्ली नगरपंचायतीवर अखेर भाजपचा झेंडा!
रेखाताई मोहूर्ले नगराध्यक्षपदी विराजमान
तालुका प्रतिनिधी आदित्य चिप्पावार
एटापल्ली : एटापल्ली नगरपंचायतीमध्ये दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावानंतर मोठे सत्तांतर झाले असून काँग्रेस पक्षाला जबर धक्का देत भाजपने बाजी मारली आहे. भाजपच्या रेखाताई मोहूर्ले यांनी नगराध्यक्षपदी विराजमान होत स्थानिक राजकारणावर कमळ फुलवले आहे.विशेष म्हणजे, भाजपकडे केवळ तीन नगरसेवक असतानाही रेखाताई मोहूर्ले यांनी विरोधी पक्षांना सोबत घेऊन हा अविश्वसनीय विजय मिळवला आहे.
एटापल्ली नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) रेखाताई मोहूर्ले यांनी काँग्रेसच्या दिपयंती पेंदाम यांचा पराभव केला.हा विजय भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण भाजपचे संख्याबळ फक्त तीन नगरसेवकांचे असतानाही त्यांनी ही निवडणूक जिंकली.रेखाताई मोहूर्ले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा मिळवून काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावला.
या निवडणुकीत रेखाताई मोहूर्ले यांना एकूण ११ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या दिपयंती पेंदाम यांना केवळ ६ मते मिळाली.सर्वात मोठा धक्का काँग्रेस पक्षाला बसला कारण त्यांच्याच एका नगरसेवकाने भाजपच्या उमेदवाराला मतदान केले आणि सत्तांतरामध्ये निर्णायक भूमिका बजावली.
ही मतदान प्रक्रिया हात उंचावून पार पाडण्यात आली.विरोधी पक्षांनीही भाजपला साथ दिल्याने काँग्रेसला मोठा राजकीय फटका बसला आहे.
आमदार धर्मरावबाब आत्राम यांच्या उपस्थितीत जल्लोष
ऐतिहासिक विजयानंतर नवनियुक्त नगराध्यक्ष रेखाताई मोहूर्ले यांनी थेट आमदार धर्मरावबाब आत्राम यांची भेट घेतली.नगरपंचायत एटापल्लीपासून ते भगवंतराव महाविद्यालयापर्यंत भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष आणि विजय मिरवणूक काढली. या मिरवणुकीदरम्यान कार्यकर्त्यांनी आमदार आत्राम यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.विशेष म्हणजे आमदार धर्मरावबाब आत्राम हे त्याचवेळी भगवंतराव महाविद्यालयात कार्यकर्त्यांच्या एका बैठकीसाठी उपस्थित होते.त्यांच्या उपस्थितीत हा विजयोत्सव साजरा करण्यात आला.
‘किंगमेकर’ बालूभाऊ राजकोंडावार आणि बंटीभाऊ मोहूर्ले यांची खेळी
या नाट्यमय सत्तांतरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बालूभाऊ राजकोंडावार आणि भाजपचे युवा नेते बंटीभाऊ मोहूर्ले यांनी ‘किंगमेकर’ची अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.त्यांच्या यशस्वी प्रयत्नांमुळेच नगराध्यक्षपदाची माळ भाजपच्या गळ्यात पडली, आणि स्थानिक नगरपंचायतीवर अखेर भाजपचा झेंडा फडकला.
निवडणूक प्रक्रियेचा सुरळीत कारभार
या महत्त्वपूर्ण निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी (एसडीओ) अमर राऊत यांनी जबाबदारी सांभाळली,तर मुख्याधिकारी प्रणय तांबे हेही उपस्थित होते.कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी एसडीपीओ चैतन्य कदम आणि ठाणेदार मच्छिन्द्र नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यामुळे निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली.







