Home Breaking News गडचिरोली पोलीस दलाची ‘हरीत महाराष्ट्र,समृध्द महाराष्ट्र’ अभियानात उत्तुंग भरारी…

गडचिरोली पोलीस दलाची ‘हरीत महाराष्ट्र,समृध्द महाराष्ट्र’ अभियानात उत्तुंग भरारी…

157

तालुका प्रतिनिधी आदित्य चिप्पावार

एटापल्ली उपविभागीय कार्यालयाच्या परिसरात एकाच दिवशी ७० वृक्षांची लागवड

एटापल्ली : महाराष्ट्र राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी “हरीत महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र” अभियानाला गडचिरोली जिल्हा पोलीस दलाकडून मोठ्या उत्साहात आणि प्रभावीपणे प्रतिसाद देण्यात येत आहे. शासनाने सन २०२५ मध्ये एकूण १० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवले असून त्यापैकी गृह विभागाला ५ लक्ष आणि गडचिरोली जिल्हा पोलीस दलास तब्बल १०,००० वृक्षांचे उद्दीष्ट दिले आहे. या उद्दीष्टपूर्तीसाठी पोलीस दलाने कंबर कसली असून पोलीस अधीक्षक नीलोत्पल सर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यात हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविला जात आहे.

या अभियानांतर्गत पोलीस अधीक्षक नीलोत्पल सर यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुळ राज आणि अपर पोलीस अधीक्षक अहेरी सत्य साई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दलाचे जवान पर्यावरणाच्या रक्षणासाठी सरसावले आहेत.

त्याच अनुषंगानेदिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी, एटापल्ली यांचे कार्यालय परिसरामध्ये वृक्षारोपणाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली चैतन्य कदम यांच्या पुढाकाराने आणि नेतृत्वाखाली कार्यालयातील कर्मचारी तसेच जलद प्रतिसाद पथक, एटापल्लीचे पोउपनि आकाश कडव व पथकातील जवानांनी सक्रिय सहभाग घेतला.

या एकाच दिवशी एटापल्ली कार्यालयाच्या परिसरात तब्बल ७० वृक्षांची लागवड करून शासनाच्या या पर्यावरणपूरक उपक्रमास मोठे योगदान दिले आहे.

एटापल्ली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या परिसरासह यापूर्वीच उपविभागाच्या अखत्यारीतील पोलीस स्टेशन एटापल्ली, कोटमी,पिपली बुर्गी,उपपोस्टे कसनसूर,पोमके हालेवारा व बोलेपल्ली येथेही मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्हा पोलीस दल केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्यच नव्हे, तर ‘हरीत महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र’ अभियानात सक्रिय सहभाग घेऊन पर्यावरणाची जपणूक करण्याची आपली सामाजिक जबाबदारीही तितक्याच समर्पित भावनेने पार पाडत असल्याचे यातून स्पष्ट होते. पोलीस दलाचा हा उपक्रम जिल्ह्यातील इतर शासकीय यंत्रणा व नागरिकांसाठी एक आदर्श उदाहरण ठरत आहे.

Don`t copy text!