Home Breaking News चंद्रपूर जिल्ह्यात वाघाची दहशत अजून किती दिवस? आठोड्या भरात गेले चार जीव…

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाची दहशत अजून किती दिवस? आठोड्या भरात गेले चार जीव…

396

संपादक प्रशांत बिट्टूरवार

चंद्रपूर :- जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात मानवी जीव जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.
नुकतेच शनिवार २५ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास नागभीड तालुक्यातील आकापूर गाव परिसरातील शेतशिवारात वाघाने एका शेतकऱ्याचा जीव घेतल्याची घटना उघडकीस आल्याने संतप्त गावकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. यात नागभीड तालुक्याच्या आकापूर गावातील वासुदेव लक्ष्मण वेटे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. सदरची घटना ताजी असतांनाच लागोपाठ शनिवार नंतर रविवार २६ ऑक्टोंबरला चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी गावात शेतात जनावरांसाठी चारा कापायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, गोंडपिपरी तालुक्यातील चेकपिपरी गावातील भाऊजी पाल या शेतकऱ्याचा वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना रविवार १९ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली होती. चेकपिपरी पासन गणेशपिपरी गाव हे अवघ्या १ किलोमीटर अंतरावर असून दोन्ही घटना एका आठवड्याच्या अंतरावर घडल्याचे दिसून येत आहे.

अल्का पांडुरंग पेंदोर वय ४३ वर्षे, रा. गणेशपिपरी, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर यांचा वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची खळबळजनक घटना काल रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. अल्का या काल रविवारी घरच्या जनावरांसाठी चारा कापण्यासाठी स्वतःच्याच शेतावर एकट्याच गेल्या होत्या. दुपार होऊनही पत्नी घरी परतली नसल्याने त्यांचे पती पांडुरंग पेंदोर दुपारच्या सुमारास शेतात गेले असता पत्नी शेतावर आढळून आली नाही. आवाज देऊनही पत्नीने प्रतिसाद दिलेला नसल्याने घाबरलेल्या पांडुरंग यांनी गावात परतून गावकऱ्यांना माहिती देत गावकरी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळून शोधमोहीम राबवली असता सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अल्का पेंदोर यांचा मृतदेह शेतशिवारात आढळून आला. घटनेने गावकरी
आक्रमक होऊन वाघाचा बंदोबस्त करणार नाही; तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.कित्तेक वाघाच्या हल्ल्यात ठार झालेले व्यक्ती कुणाचे पती, तर कुणाचे वडील होते. त्यातच कुणाच्या तरी आई होत्या. कुणावर संपूर्ण कुटुंब निर्भर होते. त्यांच्या अशा अवेळी जाण्याने कुटुंबात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती पोकळी केवळ आर्थिक मदतीने भरून निघणार नाही; तर शासनाने यावर ठोस उपाययोजना करून घटनांवर आळा घालणे गरजेचे झाले आहे.

Don`t copy text!