Home Breaking News सोमेश्वर मंदिर राजुरा सुशोभीकरण प्रकल्पावर भ्रष्टाचाराची सावली…

सोमेश्वर मंदिर राजुरा सुशोभीकरण प्रकल्पावर भ्रष्टाचाराची सावली…

147

प्रतिनिधी गौरव मोहबे

३ कोटींचा निधी खर्च, पण कामाचा मागमूस नाही: पुरातत्व विभागाचे केवळ कागदी काम

Someshwar Temple Rajura पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या अधिपत्याखाली असलेले राजुरा येथील प्राचीन सोमेश्वर मंदिर देवस्थान हे केवळ धार्मिकच नव्हे तर ऐतिहासिक महत्त्वाचे वारसास्थळ आहे. राज्य संरक्षित स्मारक या नात्याने या मंदिराच्या संरक्षणासाठी शासनाकडून “एक छत्री योजना” अंतर्गत आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये तब्बल ३ कोटी ३४ लाख ७८ हजार ८७७ रुपये निधी मंजूर करण्यात आला. परंतु या कोट्यवधी रुपयांचा ठोस वापर मंदिर परिसरात प्रत्यक्षात दिसून येत नसल्याचा भारी भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त होत आहे.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा, राजुरा चे अध्यक्ष मिलींद गड्डमवार यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून पुरातत्व विभागाकडून मिळवलेल्या दस्तऐवजांनुसार हा प्रकल्प केवळ कागदोपत्री आणि लेखी नोंदींवरच “पूर्ण” दाखवला गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अनियमिततेच्या विरोधात पंचायतने राजुरा Rajura येथे पत्रकार परिषद घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तातडीने चौकशीची मागणी केली आहे.

कागदावर झाले “पूर्ण”, प्रत्यक्षात कामच नाही

पुरातत्व विभागाच्या नागपूर विभागीय कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, “एक छत्री योजना” अंतर्गत सोमेश्वर मंदिराचे केमिकल प्रक्रिया, सौंदर्यीकरण, संरक्षण भिंत, व सपाटीकरण या कामांसाठी २ कोटी ५३ लाख ८ हजार ८३८ रुपये मंजूर करण्यात आले. त्यातील २ कोटी ५३ लाख १ हजार ८८० रुपये खर्च झाल्याचे विभागाने लेखी नोंदवले आहे.

मात्र मंदिर परिसरात प्रत्यक्ष पाहणी केल्यावर अशा प्रकारचे कोणतेही काम झाल्याचे दृश्य पुरावे मिळत नाहीत. केमिकल प्रक्रियेचा दावा करण्यात आला असला तरी संपूर्ण मंदिराची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही; केवळ काही भिंती आणि पाया भागावरच थोडकं काम झाल्याचे दिसून आले.

याच कालावधीत “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या योजनेअंतर्गत स्वच्छतागृह व जनसुविधा केंद्र उभारणीसाठी ८१ लाख ७० हजार ३९ रुपये मंजूर झाले. त्यातील ४९ लाख २ हजार २४ रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले, आणि काम ‘प्रगतीपथावर’ असल्याचे विभागाकडून कळविण्यात आले.

परंतु प्रत्यक्षात स्वच्छतागृहाची इमारत निकृष्ट दर्जाच्या साहित्याने उभी करण्यात आली असून, पाया आणि भिंतींमध्ये आधीच तडे दिसत आहेत. सर्वात गंभीर म्हणजे — कामाचे नाव, निधी व ठेकेदाराची माहिती देणारा फलक परिसरात लावण्यात आलेला नाही. हे संपूर्ण काम गोपनीयतेत आणि पारदर्शकतेच्या अभावात पार पाडले गेले, असा ठाम आरोप गड्डमवार मिलिंद गड्डमवार यांनी केला.

Don`t copy text!