‘गडचिरोली : नद्यांचा जिल्हा – समृद्धीचा कणा’…
गडचिरोली, घनदाट जंगलं आणि नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी ओळखला जाणारा जिल्हा, ‘नद्यांचा प्रदेश’ म्हणूनही ओळखला जातो. या जिल्ह्याच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक जीवनात नद्यांना विशेष महत्त्व आहे. नद्यांनी गडचिरोलीची जमीन सुपीक केली आहे, जैवविविधता जपली आहे, आणि इथल्या जनजीवनाला एक वेगळी ओळख दिली आहे.
गडचिरोलीतील नद्यांचे जाळे
गडचिरोली जिल्ह्यात अनेक लहान-मोठ्या नद्या आहेत. काही नद्यांचा उगम इथेच होतो, तर काही शेजारच्या राज्यांतून जिल्ह्यात येतात.
जिल्ह्यात उगम पावणाऱ्या नद्या: सती नदी (७१ किमी), खोब्रागडी नदी (८१ किमी), कठाणी नदी (५८ किमी), पोहार नदी (४९ किमी), दिना नदी (४५ किमी), आणि सर्वात मोठी प्राणहिता नदी (११५ किमी) या नद्या गडचिरोलीतच उगम पावतात.
गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व सीमेवरून वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, गोदावरी आणि इंद्रावती या पाच प्रमुख नद्या वाहतात. वैनगंगा नदी जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवरून वाहत जाते आणि चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथे वर्धा नदीला मिळते. या दोन्ही नद्यांच्या संयुक्त प्रवाहाला ‘प्राणहिता’ असे म्हणतात. पुढे, ही नदी जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवरून वाहत जाऊन सिरोंचा येथे गोदावरीला मिळते. इंद्रावती नदी जिल्ह्याच्या दक्षिण-पूर्व सीमेवरून वाहते आणि सिरोंचा तालुक्यातील सोमनूरजवळ गोदावरीला मिळते. बांडिया, पर्लकोटा आणि पामलगौतम या नद्या इंद्रावतीला मिळतात. तर, गाढवी, खोब्रागडी, कठाणी, वैलोचना आणि दिना या नद्या जिल्ह्याच्या उत्तर भागात वाहतात. यापैकी पहिल्या चार नद्या वैनगंगेला, तर दिना नदी प्राणहिता नदीला मिळते.