प्रतिनिधी प्रशांत बिट्टूरवार:
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील साखरवाही येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही बैलपोळा उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला आमदार किशोर जोरगेवार उपस्थित राहून सहभागी झाले. यावेळी त्यांनी बैलजोडीची पूजा करून सन्मान केला तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले, “बैलपोळा हा केवळ धार्मिक वा पारंपरिक सण नसून शेती संस्कृतीचा आत्मा आहे. शेतकरी आणि बैल यांची जोडी ही अन्नधान्य निर्मितीमागील खरी ताकद आहे. त्यांच्या श्रमांचा सन्मान करून आपण कृतज्ञतेची भावना व्यक्त करतो. महाराष्ट्राची ही परंपरा बैलांप्रती असलेले प्रेम, आपुलकी, निष्ठा आणि निसर्गाशी असलेले घट्ट नाते अधोरेखित करते.”
तसेच त्यांनी पुढे सांगितले की, बैलांचा सन्मान करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनातील त्यांच्या महत्त्वाची कबुली देणे होय. त्यांच्या श्रमांशिवाय शेती अपूर्ण आहे, म्हणूनच बैलपोळा हा सण म्हणजे त्यांच्या त्याग, श्रम आणि निष्ठेला मानाचा मुजरा अर्पण करण्याचा सोहळा असल्याचे ते म्हणाले