*_गडचिरोली–आरमोरी राष्ट्रीय महामार्ग फोरलेनला मंजुरी –मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश_*

151

दिं. १७ ऑगस्ट २०२५
गडचिरोली : गडचिरोली ते आरमोरी या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय महामार्ग (NH-353C) ला अखेर फोरलेनचा दर्जा मिळाला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसुविधेत मोठी भर पडणार असून वाहतुकीसाठी सुरक्षित आणि सुलभ मार्ग उपलब्ध होणार आहे.

माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे वारंवार मागणी केली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे.
*प्रकल्पाची माहिती*
मार्ग : आरमोरी ते गडचिरोली (NH-353C) लांबी : ३६.९०० किमी,अंतर : ७७.९०० किमी ते ११४.८०० किमी कामाचा प्रकार : पुनर्वसन व उन्नतीकरण करून चार-लेन मानकात रुपांतर
पद्धत : HAM (Hybrid Annuity Mode)
*_फॉरेस्ट अडथळ्यांवर मात_*
या रस्त्याच्या उभारणीत सर्वात मोठी अडचण म्हणजे वन विभागाची (Forest) मंजुरी होती. त्यामुळे सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात विलंब होत होता. मात्र मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी सततच्या पाठपुराव्यामुळे या अडचणीवर मात करण्यात यश मिळाले.
मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी या प्रकल्पाला मिळालेल्या मंजुरीबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले : “गडचिरोली–आरमोरी मार्गावर दिवसेंदिवस वाहतुकीचा ताण वाढत होता.गडचिरोली नागपूर हा महामार्गावर असल्याने हा रस्ता सर्वात रहदारी व वर्दळीचा असुन गडचिरोली हे मुख्यालयाचे ठिकाण आहे यामुळे लोक मोठ्या प्रमाणात रस्त्याचा प्रवास करतात.रस्ते सुस्थितीत असतील तरच जनजीवन सुरक्षित राहते. नागरिकांच्या या महत्त्वाच्या मागणीस अखेर न्याय मिळाला आहे. या संदर्भात पाठपुरावा करून मदत करणारे राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मान. देवेंद्रजी फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”
*जिल्ह्यासाठी मोठा दिलासा*
या निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना प्रवासाचा वेळ वाचणार असून वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा रस्ता हा ‘जीवनवाहिनी’ ठरणार आहे.