निराधारांच्या रखडलेल्या अनुदानाबाबत ना.सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र…

214

चंद्रपूर, दि. 23 : संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत राज्यातील निराधार व्यक्तिंना शासनाकडून दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांचे अनुदान एप्रिल महिन्यांपासून प्राप्त न झाल्यामुळे निराधार व्यक्तिंना अडचणीचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात येताच राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे यांना अनुदान तातडीने वितरित करण्यासाठी कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. निराधार व्यक्तींचे रखडलेले अनुदान लवकरात लवकर वितरीत करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी विनंती पत्राद्वारे केली आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना एप्रिल 2024 ते आजतागायत संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान प्राप्त न झाल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याअनुषंगाने संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील अनुदान जिल्हा स्तरावर वितरीत करण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, अशी विनंती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.