HomeBreaking Newsसंविधान चौकात संविधानाचे वाचन करुन केलाय संविधानाचा जागर...राष्ट्राची एकता, एकात्मता आणि बंधुता...

संविधान चौकात संविधानाचे वाचन करुन केलाय संविधानाचा जागर…राष्ट्राची एकता, एकात्मता आणि बंधुता प्रवर्धित करण्यासाठी संविधान फाऊंडेशनच्या वतीने या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन…

नागपूर, स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष, ६२ वा महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिवसाच्या निमित्ताने संविधान फाऊंडेशनच्या वतीने दि. १ मे २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वा. नागपूरातील संविधान चौकात संविधान वाचन करून संविधानाचा जागर करण्यात आला. अशाप्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम आहे.

राष्ट्राची एकता आणि एकात्मतेसाठी बंधुभाव प्रवर्धित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सद्या देशात, जाती-धर्मावरून माणसामाणसात द्वेष निर्माण करण्याच्या प्रयत्न होत आहे. तेव्हा, समानता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायाच्या तत्वानुसार माणसे जोडण्याचा संकल्प होणे गरजेचे आहे. प्रेम, मैत्री, करुणा या शाश्वत मूल्यांचा जागर होऊन बंधुभावाचा भारत निर्माणासाठी आयोजित या अनौपचारिक कार्यक्रमात वंचितांचे प्रतिनिधी, सामाजिक प्रश्नांवर काम करणारे कार्यकर्ते, शहरातील प्रबुद्ध नागरिक व तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

प्रारंभी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ‌. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. संविधान फाऊंडेशनचे संस्थापक व माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून संविधान वाचन उपक्रमाची भूमिका विशद केली. भारत देशाला सुंदर, समृद्ध, विकसित आणि शक्तिशाली करण्यासाठी देशाच्या संविधानिक नितीमूल्यांच्या आचारणाशिवाय दुसरा मार्ग नाही. आपण देश घडविणारे बनू या, बिघडविणारे नाही, असा संदेश त्यांनी दिला. जाती-धर्मांच्या नावाने समाजात द्वेष पसरविणे हे देशाच्या अखंडतेला मारक ठरते. राजकीय सत्ता स्वार्थासाठी असे करणे म्हणजे संविधान धोक्यात आणणे होय, असे इ. झेड. खोब्रागडे म्हणाले.

नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचे वाचन अभिजीत मेश्राम, धर्मस्वातंत्र्याचा हक्काचे वाचन पल्लवी वानखेडे व नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याचे वाचन निर्जरा मेश्राम यांनी केले. ‘वैरभावना विरहित भारत देश असावा’ हे बंधुता प्रवर्धित करणारे गीत अशोकराव धोंगडे यांनी गायले.

कार्यक्रमाला अतिरिक्त आयकर आयुक्त धनंजय वंजारी, दीनबंधू नितीन सरदार, ज्ञानेश्वर रक्षक, नरेश वाहने, प्रमोद काळबांडे, डॉ. सिद्धार्थ कांबळे, नरेश मेश्राम, ह्रदय चक्रधर, प्रा. रमेश पीसे, संध्या राजूरकर, डॉ. राजेंद्र फुले, दिगंबर गोंडाणे, नरेश साखरे, वैशाली गोसावी, हर्षदीप घुगे इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

वंचितांच्या विकासासाठी काम करणारे खुशाल ढाक, प्रीती हजारे, तुफान उईके, दीपक साने, धीरज भिशीकर, आतिश पवार, चंद्रभान राऊत, सुनिता रामटेके, जया कलहारि, निखिल भुते, मोहम्मद हाफिज साबरी व जोगराणा रामाजी या कार्यकर्त्यांचा संविधान फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

संविधान वाचन कार्यक्रमाच्या निमित्ताने खुशाल ढाक, अतुलकुमार खोब्रागडे, बरखा पटनाईक, यश गौरखेडे व प्रमोद काळबांडे यांनी विचार व्यक्त केले. अतिरिक्त आयकर आयुक्त धनंजय वंजारी यांनी समारोपीय मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन विजय बेले यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!