चकमकीत जखमी नक्षलवाद्यावर पोलिसांकडून सुरू आहे उपचार…

688

गडचिरोली,ता.११: पंधरा दिवसापूर्वी खोब्रामेंढा-हेटळकसा जंगलात झालेल्या चकमकीत जखमी झालेला नक्षल कमांडर किशोर कवडो याला पोलिसांनी पकडून दवाखान्यात भरती केले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहे.

२९ मार्चला खोब्रामेंढा-हेटळकसा जंगलात पोलिस दलाच्या सी-६० पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षल्यांशी झालेल्या चकमकीत जहाल नक्षली भास्कर हिचामी याच्यासह पाच नक्षली ठार झाले होते. त्यानंतर कटेझरी पोलिस मदत केंद्रातील पोलिसांनी शोध मोहीम राबविली असता टिपागड एरिया प्लॉटून क्रमांक १५ चा कमांडर किशोर उर्फ गोंगलू उर्फ सोबू घिसू कवडो(३८) हा जखमी अवस्थेत आढळून आला.

किशोर कवडो याच्या पायाला गोळी लागली असून, पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्याची प्रकृती व्यवस्थित असल्याचे पोलिसांनी सांगितले. चकमक, खून, जाळपोळ अशा अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे. त्यामुळे पोलिस विभाग त्याच्यावर पुढील कारवाई करणार आहे.

किशोर कवडो हा एटापल्ली तालुक्यातील रामनटोला येथील मूळ रहिवासी आहे.