चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत 24 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त…

526

चंद्रपूर शहरात सध्या ब्राऊन शुगर सारख्या अंमली पदार्थांची मागणी वाढली आहे. आज स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत आरोपीकडून 24 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त केली.

वरोरा नाका परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. यात 24 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीचे नाव अजय सीताराम गुणीरविदास असे नाव आहे.

चंद्रपुरात दारुबंदी झाल्यापासून अंमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. महाविद्यालयीन युवक-युवती या नशेच्या जाळ्यात ओढले गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा अंमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. यासाठीचे एक वेगळे रॅकेट सक्रिय आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात यावर कारवाई करण्याचा सपाटा सुरू झाला आहे. यापूर्वी 55 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली होती. आज दुपारी दीडच्या सुमारास एक युवक खासगी ट्रॅव्हल्समधून नागपूरहुन चंद्रपूर सोबत ब्राऊन शुगर घेऊन येत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.

त्यानुसार वरोरा नाका येथे सापळा रचण्यात आला. हा युवक वरोरा नाक्यावर उतरताच त्याला पकडण्यात आले. तपासणी केली असता दोन पॅकेटमधून तब्बल 24 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली ज्याची किंमत एक ते दीड लाखाच्या घरात आहे.

अजय सीताराम गुणीरविदास असे या आरोपीचे नाव असून तो लालपेठ कोलॅरी येथील रहिवासी आहे. तो उच्चशिक्षीत असून त्याने इंजिनिअरिंग केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.