राजकीय ब्रेकिंग! काँग्रेस मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण..

712

मुंबई: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं, अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह अनेकांना कोरोनाची बाधा झाली होती, त्यातच आता मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाच काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्यानं विधिमंडळात खळबळ उडाली आहे.

काँग्रेस मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोना झाल्याची माहिती आहे, याबाबत वडेट्टीवारांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे की, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबई येथे असून आज कोरोनाचे लक्षण दिसल्याने मी कोविडची चाचणी केली, या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत आहे, लवकरच आपल्या सेवेत पुन्हा रुजू होईल असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच मागील २ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांनी, नागरिकांनी काळजी घ्यावी असंही त्यांनी सांगितले आहे. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबईत सुरु असलेल्या अधिवेशनात विजय वडेट्टीवार सहभागी झाले होते, या अधिवेशनात विधान भवन परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सगळेच आमदार, अधिकारी उपस्थित असतात, त्यामुळे आता वडेट्टीवारांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनीच कोरोनाची चाचणी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येत असलेल्या अधिवेशनासाठी ठाकरे सरकारने विशेष खबरदारी घेतली होती, यात विधिमंडळात प्रवेश करण्यासाठी आमदार, मंत्री, अधिकारी, पत्रकार, आमदार-मंत्र्यांचे सहकारी कर्मचारी सर्वांनाच कोरोना चाचणी करणं बंधनकारक होते, अधिवेशनापूर्वी ३२०० जणांची चाचणी करण्यात आली, यात २५ जणांना कोरोना झाल्याचं समोर आलं होतं.