नागरीकांना सेवा पुरविण्यात गोंडपिपरी आरोग्य प्रशासन असक्षम…

640

नागेश इटेकर
गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत तातडीने वैद्यकीय सेवा प्रकल्पामध्ये रुग्ण दाखल होण्या पूर्वीची आरोग्य सेवा (जीवनदायी रुग्णवाहिका) चे स्वरुपात देण्यात येते. त्यामधे रस्ते अपघातात जख्मी झालेले रूग्ण, सर्व गंभीर आजार, नवजात शिशु संबंधीत आजार, गंभीर गरोदर महिला, नैसर्गीक आपत्तीत सापडलेले आणि मानवी जोखमिमुळे झालेले रुग्ण, गंभीर हृदय रोगी, सर्प दंशाचे रुग्ण, अन्नातून विषबाधा, स्वसणाचे रोग इत्यादी तातडीच्या आणि आकस्मिक सेवा रूग्ण वाहिकेच्या माध्यमातून रूग्णांना पुरविण्यात येते.

रूग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणाऱ्या मोटर गाडीला रुग्णवाहिका” *AMBULANCE*”असे संबोधल्या जाते. आरोग्य सेवेत रुग्णवाहिका हे अतिशय महत्त्वाचा घटक आहे. परंतु गोंडपिपरी ग्रामीण रूग्नालयातील अधिकाऱ्यांना याचा विसर पडल्याचे दिसते. सद्यपरिस्थितीत रुग्णालयात दोन रुग्णवाहिका असून त्या व्दारे तालुक्यातील नागरीकांना सेवा पुरविण्यात येते. काही दिवसातच दोन नविन रुग्णवाहिका रुग्णालयात दाखल होणार असल्याची माहिती आहे. नवीन वाहिका दाखल झाल्यास रुग्णालयात एकुण चार रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज राहतील.

परंतु सध्या त्या दोन रुग्णवाहिकांचा सांभाळ एकच वाहक करत आहे, दोघांचा भार एकाच वाहकावर पडल्याने वेळीच सेवा बजावण्यात तो असमर्थ ठरत आहे.या गोष्टीकडे तालुका आरोग्य प्रशासनाने कमालीचे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. सद्या एका वाहकाच्या भरवशावर दोन रुग्णवाहिकेचा कर्तव्य बजावून घेत आहे. पण काही दिवसातच पालकमंत्री आणि खासदार निधी अंतर्गत दोन नविन रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहेत. आत्ता तर एकच वाहक कर्तव्यावर असुन दोन वाहिन्यांचा भार पेलत आहे. ऊर्वरीत एक आणि नविन येणाऱ्या दोन वाहिन्या कोणाच्या भरवशावर सेवा देतील..? वाहकाविना शोभेची वस्तू म्हणुन तर राहणार नाही ना..?असा प्रश्न तालुक्यातील नागरीकांना पाडला आहे.

आरोग्य प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आरोग्य सेवा दिवसेंदिवस कोलमडत चालली आहे. नागरीकांना पाहिजे तशी सेवा मिळत नसल्याने त्रासून खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीत खाजगी वाहनांचा आधार घेऊन उपचारासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेला जात आहे.

बरेचदा रुग्णालयात वाहक असते तेव्हा वाहिन्या राहत नाही आणि वाहिन्या असते तेव्हा वाहक राहत नाही असे चित्र दिसून आले आहे. हि परिस्थिती बदलली पाहिजे, त्यासाठी आरोग्य प्रशासन या प्रकरणाकडे वेळीच लक्ष घालून रुग्णवाहिका कर्मचार्यांच्या संख्येत वाढ करून जनतेला पाहिजे तेव्हा तत्काळ सेवा पुरविण्यात यावे अशी गोंडपिपरी तालुक्यातील समस्त जनतेची मागणी आहे.