शहीद जवान सचिन मोरे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

0
119
शहीद जवान सचिन मोरे यांच्या पार्थिवावर
लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
 नाशिक / प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्याच्या मालेगावातील साकुरी गावचा सुपुत्र जवान सचिन मोरे यांच्या पार्थिवावर आज (दि.२७) शोककुल वातावरणात तसेच लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारतमाता की जय, शहीद जवान अमर रहे अशा घोषणांनी आसमंत भारावला होता.
भारतीय सेनेच्या एस-पी-११५ रेजिमेंटमध्ये कर्तव्य बजावणारे जवान अभियंता सचिन विक्रम मोरे यांना भारत-चीनच्या सीमेवरील गलवान खोऱ्यातील नदीत आपल्या सहकारी जवानांना वाचवताना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव शनिवारी सकाळी मूळगावी लष्करी वाहनाने दाखल झाले. तत्पूर्वी पुणे विमानतळावर शहीद सचिन मोरे यांचे पार्थिव दाखल झाल्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.
 आज सकाळी शहीद सचिन मोरे यांचे पार्थिव नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, साकुरी गाव येथे दाखल झाले. राजकीय नेते मंडळी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद सचिन मोरे यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर लष्करी जवानांनी हवेत गोळ्या झाडून मानवंदना दिल्यानंतर त्यांच्या भावाने मुखाग्नि दिला. यावेळी नागरिकांनी शहीद सचिन मोरे अमर रहेच्या जोरदार घोषणा करून चिनी वस्तूंवर बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला.
सचिन मोरे यांच्या पश्चात वडील विक्रम मोरे, आई जिजाबाई, पत्नी सारिका सचिन मोरे, दोन मुली व अवघ्या सात महिन्यांचा मुलगा, लहान भाऊ योगश व नितीन असा परिवार आहे. या दु:खद प्रसंगी हजारोंच्या संख्येने मालेगावकरांसर नाशिक जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी कृषी मंत्री दादाजी भुसे, खासदार सुभाष भामरे, भारती पवार,आमदार सुहास कांदे,माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार जयवंतराव जाधव, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मालेगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय निकम, प्रांतअधिकारी तहसीलदार यांच्यासह विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी शहीद सचिन मोरे यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये व एकाला शासकीय नोकरी तसेच मुलांचा शिक्षणाचा खर्च केंद्र सरकार करेल, अशी घोषणा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here