Home Breaking News जनतेचा जिल्हाधिकारी! सिरोंचा–जिमलगट्टा परिसरात न्याय देणाऱ्या कलेक्टरचे जोरदार स्वागत…

जनतेचा जिल्हाधिकारी! सिरोंचा–जिमलगट्टा परिसरात न्याय देणाऱ्या कलेक्टरचे जोरदार स्वागत…

118

जनतेचा जिल्हाधिकारी! सिरोंचा–जिमलगट्टा परिसरात न्याय देणाऱ्या कलेक्टरचे जोरदार स्वागत.

जिल्हा संपादक नितेश खडसे

गडचिरोली जिल्हाधिकारी यांच्या जनहिताच्या कार्याचे सिरोंचा, जिमलगट्टा व अहेरी परिसरात जोरदार कौतुक होत असून स्थानिक नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. अनुसूचित क्षेत्रातील जनतेच्या समस्या थेट ऐकून तत्काळ निर्णय घेणाऱ्या प्रशासनाच्या भूमिकेमुळे सामान्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
भारतीय संविधानाने जिल्हाधिकाऱ्यांना व्यापक अधिकार दिले असून अनुसूची ५ अंतर्गत येणाऱ्या गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात या अधिकारांचा लोकहितासाठी प्रभावी वापर होऊ शकतो, याचे उदाहरण अलीकडे पाहायला मिळाले. स्थानिकांच्या मते, छोट्या वाटणाऱ्या पण अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांनी थेट हस्तक्षेप करून दिलेला न्याय गोरगरीबांसाठी मोठा दिलासा ठरला आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यासाठी हजारो कोटींच्या राष्ट्रीय महामार्गांना मंजुरी दिली आहे. मात्र घनदाट जंगल व प्रशासकीय अडचणींमुळे काही मार्गांचे काम संथ गतीने सुरू होते. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली नियोजन बैठकीत महामार्ग कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
आलापल्ली ते सिरोंचा मार्ग अत्यंत खराब झाल्याने एसटी वाहतूक काही प्रमाणात बंद करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून खाजगी वाहनांच्या टपावर बसून प्रवास करावा लागत होता. या गंभीर समस्येबाबत स्थानिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तक्रारीची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी एसटी डेपोला भेट देत संबंधित अधिकाऱ्यांना थेट आदेश दिले. परिणामी काही दिवसांतच सिरोंचा व आसरअली मार्गावरील बसेस पुन्हा सुरू करण्यात आल्या आणि जनतेला दिलासा मिळाला.
जिमलगट्टा परिसरात चहाच्या टपऱ्यांपासून बाजारपेठेपर्यंत या निर्णयाची चर्चा रंगताना दिसत आहे. “जिल्हाधिकारी स्वतः डेपोमध्ये जाऊन बसेस सुरू केल्या,” अशी प्रतिक्रिया देत स्थानिकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. दुर्गम भागातील नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा अधिकारी मिळाल्याचा अभिमान लोक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, किष्टापूर-जिमलगट्टा येथे वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मारक उभारणीच्या पार्श्वभूमीवरही प्रशासन सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. विकासकामांसह जनतेच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देणाऱ्या प्रशासनामुळे ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी राज्य सरकार व प्रशासनाचे आभार मानत, “कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील जिल्हाधिकारी मिळणे ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे,” अशी भावना व्यक्त केली.

Don`t copy text!