Home Breaking News भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी शेखर शेट्टी यांची निवड; २४ नगरसेवकांचा अधिकृत गट...

भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी शेखर शेट्टी यांची निवड; २४ नगरसेवकांचा अधिकृत गट स्थापन…

75

भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी शेखर शेट्टी यांची निवड; २४ नगरसेवकांचा अधिकृत गट स्थापन

संपादक प्रशांत बिट्टूरवार 
नागपूर |
भारतीय जनता पार्टीच्या वतीने महापालिकेतील २४ नगरसेवकांचा अधिकृत गट स्थापन करण्यात आला असून या गटाच्या नेतृत्वाची जबाबदारी इंडस्ट्रियल प्रभागातून विजयी झालेले नगरसेवक शेखर शेट्टी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. भाजपच्या गटनेतेपदी शेखर शेट्टी यांची निवड अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली असून या निर्णयामुळे शहराच्या राजकारणात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाली आहे.
सोमवारी नागपूर येथील भाजपच्या विभागीय कार्यालयात भाजपचे २३ नगरसेवक आणि मित्रपक्षाचा १ नगरसेवक अशा एकूण २४ नगरसेवकांच्या अधिकृत गटाची स्थापना करण्यात आली. यावेळी सर्व नगरसेवकांची उपस्थिती लक्षणीय होती.
गटनेतेपदासाठी शेखर शेट्टी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकौशल्य, संघटनात्मक अनुभव, तसेच नगरसेवकांमधील विश्वासार्ह नेतृत्वाचा विचार करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेश भाजप नेतृत्वाने या नावाला त्वरित सहमती दर्शवली. त्यानंतर शेखर शेट्टी यांच्या गटनेतेपदाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
या प्रसंगी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शेखर शेट्टी यांना शुभेच्छा देत, महापालिकेत नागरिकहिताचे निर्णय घेण्यासाठी मजबूत आणि सकारात्मक नेतृत्व देण्याची अपेक्षा व्यक्त केली. शहर विकास, पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक, उद्योगवाढ तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत भाजपचा गट प्रभावी भूमिका बजावेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.


गटनेतेपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शेखर शेट्टी यांनी सर्व नगरसेवकांचे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश नेतृत्वाचे आभार मानले. “पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन संघटितपणे काम करू. महापालिकेत भाजपची भूमिका भक्कम ठेवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहू,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
या निवडीमुळे आगामी काळात महापालिकेतील राजकीय घडामोडींमध्ये भाजप अधिक प्रभावीपणे भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Don`t copy text!