रेगडी येथे भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन!
सुरेशभाऊ शहा यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण क्रीडाक्षेत्राला नवे बळ
प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट
दिं 17/01/2026
घोट : सुरेशभाऊ शहा व्हॉलीबॉल प्रिमियर लीग अँड एस.एस. व्हॉलीबॉल क्लब, रेगडी (ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) यांच्या वतीने आयोजित भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्यांचे उद्घाटन सामाजिक बांधिलकी जपणारे, क्रीडाप्रेमी व युवकांचे मार्गदर्शक सुरेश शहा यांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या स्पर्धेमुळे संपूर्ण रेगडी व परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून युवकांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.
ग्रामीण भागातील तरुणांना खेळाची योग्य व्यासपीठे उपलब्ध व्हावीत, त्यांच्या सुप्त क्रीडागुणांना वाव मिळावा तसेच व्यसनमुक्त, सुदृढ व शिस्तबद्ध जीवनशैलीकडे युवक वळावेत, या व्यापक उद्देशाने सुरेश शहा सातत्याने प्रयत्नशील आहेत. केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता समाजकारण, क्रीडा, शिक्षण व युवक विकास या सर्व क्षेत्रांत त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या आक्रमक, स्पष्टवक्ते व जनतेच्या प्रश्नांवर ठामपणे भूमिका मांडणाऱ्या नेतृत्वामुळे ग्रामीण भागात क्रीडा चळवळीला नवी दिशा व बळ मिळाले आहे.
या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुणाल इंगळे साहेब (अध्यक्ष, पोलीस मदत केंद्र रेगडी) विराजमान होते. प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप चलाख (जिल्हासचिव, भाजप गडचिरोली), राकेश सरकार (भाजप तालुकाध्यक्ष, घोट–आष्टी मंडळ), तसेच विलास उईके (आदिवासी आघाडी तालुकाध्यक्ष, घोट–आष्टी मंडळ) यांनी उपस्थित राहून स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुरेखा गेडाम (सरपंच, रेगडी), प्रशांत शहा (जिल्हासचिव, शिवसेना गडचिरोली), उमेश शहा (सामाजिक कार्यकर्ता), तोंदेश तलांडे, पवन मेश्राम, देवराव खंडरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत सुरेश शहा यांच्या सामाजिक व क्रीडाविषयक योगदानाचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सांगितले की, “सुरेश शहा हे जनतेसाठी सदैव उपलब्ध राहणारे, युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व आहे.” अशा स्पर्धांमुळे ग्रामीण युवकांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळत असून भविष्यात जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडण्याचा मार्ग मोकळा होत आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
या ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेमुळे रेगडी परिसरात आनंद, उत्साह व एकोपा निर्माण झाला असून क्रीडाविश्वाला चालना देणारा हा उपक्रम निश्चितच आदर्श ठरेल, अशी भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.







