कोंडय्या महाराजांच्या यात्रेत भक्तिगीतांची ध्वनीचित्रफित प्रकाशित, चटप यांच्या हस्ते होणार प्रकाशन
प्रतिनिधी सिद्धार्थ दहागावकर
चंद्रपूर : तेलंगणा, आंध्रप्रदेश तसेच विदर्भातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि जागृत दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत परमहंस कोंडय्या महाराजांचा यात्रा महोत्सव उद्या शुक्रवार दि. १६ जानेवारीपासून मोठ्या भक्तिभावात सुरू होत आहे. या पवित्र यात्रेच्या निमित्ताने भाविकांसाठी एक विशेष आध्यात्मिक पर्वणी ठरणाऱ्या संत कोंडय्या महाराजांवरील भक्तिगीतांची ध्वनीचित्रफित (व्हिडिओ अल्बम) प्रकाशित करण्यात येणार आहे.
या विशेष ध्वनीचित्रफितीत संत परमहंस कोंडय्या महाराजांच्या जीवनावर आधारित गीते तसेच स्वतंत्र भक्तिगीते समाविष्ट करण्यात आली आहेत. ही सर्व गीते दास गणवीर लिखित संत कोंडय्या महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित असून, त्यामधून महाराजांचा त्याग, साधना, भक्ती, समाजप्रबोधनाचा संदेश आणि त्यांचा अलौकिक जीवनप्रवास प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. या ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून भाविकांना महाराजांच्या कार्याची व विचारांची नव्याने अनुभूती मिळणार आहे.
या भक्तिगीतांच्या ध्वनीचित्रफितीचे भव्य प्रकाशन शेतकरी नेते तथा माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. या प्रकाशन सोहळ्यास जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थेचे कोषाध्यक्ष रामकृष्ण सांगडे यांनी केले आहे.
दरम्यान, यात्रेच्या पार्श्वभूमीवर भक्तिरसाने ओथंबलेल्या कार्यक्रमांची रेलचेल असणार असून, पालखीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि. १७ व १८ जानेवारी रोजी भव्य खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. या खंजिरी भजन स्पर्धेचे उद्घाटन दि. १७ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते होणार आहे.
या भजन स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भजन मंडळांनी वेळेत नावनोंदणी करावी, असे आवाहन भजन स्पर्धा प्रमुख देविदास सातपुते, प्रवीण मेश्राम, दिलीप पुलगमकर, अभय यमनुरवार, विलास कावडे व नितीन चापले यांनी केले आहे.
संत परमहंस कोंडय्या महाराजांच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेले हे सर्व धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम भाविकांसाठी अध्यात्मिक उर्जा देणारे ठरणार असून, परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.







