एटापल्ली नगरपंचायत : १२ नगरसेवकांचे बंड
उपनगराध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठरावाचा ‘स्फोट’
तालुका प्रतिनिधी आदित्य चिप्पावार एटापल्ली
एटापल्ली : येथील नगरपंचायतीच्या राजकारणात मंगळवारी मोठी खळबळ उडाली. विद्यमान उपाध्यक्षा मीना नागुलवार यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत चक्क १२ नगरसेवकांनी एकत्र येत अविश्वास ठराव दाखल केला. यामुळे नगरपंचायतीमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
उपनगराध्यक्षांच्या कारभारावरून गेल्या अनेक दिवसांपासून नगरसेवकांमध्ये धुसफूस सुरू होती. अखेर याचा स्फोट झाला असून,ठरावावर १२ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
१७ पैकी १२ सदस्यांनी विरोधात भूमिका घेतल्याने उपाध्यक्षांची खुर्ची धोक्यात आली आहे.
महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ च्या कलम ३४१ य-६ नुसार नगराध्यक्षांकडे अविश्वासाचे पत्र सोपवण्यात आले आहे. विकासकामांत पारदर्शकता नसणे, आर्थिक व्यवहारांतील संशयास्पद निर्णय आणि सभांना दांडी मारणे यांसारखे गंभीर आरोप या बंडखोर नगरसेवकांनी लावले आहेत.







