भामरागड तालुक्यात शोककळा
भामरागड प्रतिनिधी कवीश्वर मोतकुरवार:
भामरागड तालुक्यातील भामरागड–लाहेरी मुख्य मार्गावर मेडपल्ली ते हिणबट्टी फाट्याच्या दरम्यान आज भीषण रस्ता अपघात घडला. बोलेरो पिकअप व दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या अपघातात दुचाकी चालक राजेश मुरा पुंगाटी (वय २५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या सोबत असलेले सन्नू झुरु गोटा (वय २७) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी अहेरी येथे रेफर करण्यात आले असता, दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मृत्यू पावलेले दोन्ही युवक हे भामरागड तालुक्यातील नारगुंडा गावाचे रहिवासी होते. सन्नू गोटा यांच्या पश्चात पत्नी व तीन लहान मुले असून कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही हलाखीची असल्याची माहिती असून ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच भामरागड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भामरागड पोलीस स्टेशन करीत आहे.
दरम्यान, या मार्गावर सातत्याने अपघात घडत असल्याने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे तसेच प्रशासनाने या ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.







