तालुका प्रतिनिधी आदित्य चिप्पावार
एटापल्ली : निसर्गपूजा आणि समृद्ध आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारी गडचिरोली जिल्ह्यातील ऐतिहासिक सुरजागड यात्रा यावर्षी मोठ्या उत्साहात पार पडली. ५ जानेवारीपासून सुरू झालेल्या या तीन दिवसीय सोहळ्यात हजारो आदिवासी बांधवांनी आपल्या लाडक्या ‘ठाकूर देवाच्या’ चरणी नतमस्तक होत जल,जंगल आणि जमिनीच्या रक्षणाचे साकडे घातले.
*खडतर ‘गडचढाई’ अन् श्रद्धेची पाऊलवाट*
या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे दुर्गम पहाडावर होणारी महापूजा. कडाक्याची थंडी आणि डोंगरदऱ्यांचा अत्यंत जोखीमीचा रस्ता पार करत तब्बल तीन तास पायपीट करून भाविक डोंगराच्या टोकावर पोहोचले. ‘निसर्ग वाचला तरच मानव वाचेल’ ही भावना उराशी बाळगून,पारंपारिक वाद्यांच्या गजरात झालेली ही ‘गडचढाई’ केवळ धार्मिक विधी नसून निसर्गाप्रती असलेली कृतज्ञता ठरली.
सांस्कृतिक वारशाचे जतन
गोटूल महाग्रामसभा समितीच्या नियोजनाखाली झालेल्या या यात्रेत बिदिया पूजा,घटस्थापना आणि पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. गडचिरोलीच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांमुळे संपूर्ण सुरजागड परिसर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला होता.
या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनीही हजेरी लावली.आमदार धर्मरावबाबा आत्राम,माजी मंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्यासह अनेक मान्यवरांनी ठाकूर देवाचे दर्शन घेतले.
भाविकांच्या सोयीसाठी ‘लॉइड्स मेटल्स’ कंपनीतर्फे महाप्रसाद आणि जिल्हा आरोग्य विभागातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.







