संपादक प्रशांत बिट्टूरवार
सावली येथे लोकनेते स्व. वामनराव गड्डमवार यांची ८९ वी जयंती साजरी
शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण स्थानी पोहचूनही केवळ शेतकरी व शेती व्यवसायाशी कायमचे नाते जोपासणारे लोकनेते स्व. वामनराव गड्डमवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात जो विकास व कृषी क्रांती केली. ती आजही अजरामर आहे. अशी समाजाप्रतीची त्यांची समर्पित भावना ही आम्हा राजकीय लोकप्रतिनिधींसाठी सदैव प्रेरणादायी आहे.असे प्रतिपादन राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले. ते सावली येथील विश्र्वशांती विद्यालय येथे लोकनेते स्व.वामनराव गड्डमवार यांच्या ८९ व्या जयंती निमित्ताने आयोजित शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शनी व शेतकरी सन्मान सोहळ्या प्रसंगी प्रामुख्याने उद्घाटक म्हणून बोलत होते.
आयोजित सोहळ्यास अध्यक्ष म्हणून नागपूर विभाग शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, सुशीलाताई गड्डमवार,विनायक बांगडे, सुभाष गौर, संदीप गड्डमवार, साधना वाढई, नंदाताई अल्लुरवार, उषा भोयर, अनिल स्वामी, राजाबाळ सांगिडवार, रमाताई गड्डमवार, डॉ. सुरेश महाकुलकर, नंदू नागरकर, डॉ. शेंडे, सुनील बल्लमवार, राजू भेजगमवार, रामभाऊ येणुगवार, संजय शृंगारपवार प्राचार्य डॉ. चंद्रमौली, सुनील नरेड्डिवार, रितेश जिडगलवार, दिनेश चीटनूरवार, नितीन गोहणे, डॉ. रेड्डी, विजय कोरेवार, संजय गड्डमवार यांचेसह मंचावर अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, अलीकडे आपल्या कृषिप्रधान देशातील संसद असो अथवा विधानसभा असो येथे शेती विषयावर विस्तृत चर्चा होत नाही. याची खंत नेहमीच असते.शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही. उत्पादन आणि मागणी यातील तफावत दुर होत नाही. शेतमालावर प्रचंड कर आकारल्या जातो. तर खते, बियाणे, रासायनिक औषधें प्रचंड महागल्याने शेती करणे अवघड जात आहे. आता आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. लवकरच आम्ही सावली परिसरात शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय सुरू करणार असून याचा क्षेत्रातील 5 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. तर सावली तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत गोसेखुर्द धरणाचे पाणी पोहचवून शेतकऱ्यांना समृद्ध शेतीतून प्रगती कडे नेण्याचे तत्परतेने कार्य करीत आहोत.अलीकडे काही लोक राजकारणाचे पांघरुण ओढून अर्थकारणासाठी तरुणाईला महोत्सवाच्या पाशात अडकवून दिशाभूल करण्याचे काम करीत आहे. असा टोलाही त्यांनी विरोधी पक्षातील नवख्या पुढाऱ्यांना लगावला. मात्र आम्ही दिवंगत लोकनेते वामनराव गड्डमवार यांच्या प्रेरणादायी कार्याचा वारसा समर्थपणे पुढे नेणार असेही ते यावेळी म्हणाले. तत्पूर्वी लोकनेते स्व. वामनराव गड्डमवार यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याला दिलेली विकासाची नवी दिशा, कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी, शेती व्यवसायात योगदान व झालेली प्रगती याबद्दल आपल्या प्रास्ताविकातून माहिती विषद केली. यानंतर मंचावर उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून स्व. वामनराव गड्डमवार यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
तर लोकनेते दिवंगत वामनराव गड्डमवार यांनी आपल्या ऐतिहासिक राजकीय कारकीर्दीत चंद्रपूर जिल्ह्यात घडवून आणलेली विकास व कृषी क्रांती याची थोडक्यात माहिती विषद करणारी चित्रफीत उपस्थिता शेतकरी बांधवांसमोर प्रदर्शित करण्यात आली. तर विविध कृषी निविष्ठा पुरविणाऱ्या नामवंत कंपन्यांनी बियाणे, खते, फळभाज्या उत्पादन, व कृषी वर आधारित उत्पादनांचे माहित स्टॉल दर्शनीय भागात लावून त्याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी शेती व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रगतशील शेतकरी बांधवांचा शाल, श्रीफळ व भेट वस्तू देऊन त्यांच्या सन्मान करण्यात आला.आयोजित कार्यक्रमास सावली तालुक्यातील शेतकरी बांधव, काँग्रेस पक्षाचे नेते व पदाधिकारी, कार्यकर्ते तथा शिक्षक व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.







