रेगडी येथे बँक सेवा सुरू करा; अन्यथा आंदोलन – प्रशांत शाहा यांचा इशारा…

98

रेगडी येथे बँक सेवा सुरू करा; अन्यथा आंदोलन – प्रशांत शाहा यांचा इशारा

प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट

चामोर्शी तालुक्यातील प्रमुख व वाढत्या लोकसंख्येच्या गावांपैकी एक असलेल्या रेगडी येथे त्वरित बँक शाखा सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हा सचिव प्रशांत शाहा यांनी केली आहे. रेगडी व परिसरातील नागरिकांना आर्थिक व्यवहारांसाठी दूरवर जावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोयी होत आहेत.

रेगडी हे केंद्रस्थान असलेले गाव असून येथे गरंजी, कर्मे, कोंदावाही, वेंगनूर, विकासपल्ली, माडेआमगाव, मकेपल्ली, पोतेपल्ली, पुसगुडा, बोलेपल्ली, देवदा, मोरखंडी अशा अनेक गावांचा समावेश होतो. या सर्व गावांचा दैनंदिन आर्थिक व्यवहार रेगडीमार्फत होत असला तरीही येथे अद्याप बँक शाखेचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.

रेगडी येथे शासकीय आश्रमशाळा, पोलिस स्टेशन, जिल्हापरिषद शाळा, महाविद्यालय, आरोग्य केंद्र अशा महत्त्वाच्या शासकीय संस्था असूनही बँक सेवा उपलब्ध नसणे हा गंभीर मुद्दा असल्याचे शाहा यांनी सांगितले.

“रेगडी येथे तात्काळ बँक शाखा सुरू करण्यात यावी; अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल,” असा ठाम इशारा प्रशांत शाहा यांनी प्रशासनाला दिला आहे.

स्थानिक नागरिकांमध्येही या मागणीबाबत तीव्र नाराजी असून लवकरात लवकर निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.