रेगडी येथील राजे धर्मराव शाळेत मुख्याध्यापक गैरहजेरीमुळे शाळेचे कामकाज विस्कळीत…

168

रेगडी येथील राजे धर्मराव शाळेत मुख्याध्यापक गैरहजेरीमुळे शाळेचे कामकाज विस्कळीत; पालक व ग्रामस्थांत नाराजीचा सूर

प्रतिनिधी गौरव बुरांडे

रेगडी/चामोर्शी :
स्थानिक राजे धर्मराव शाळेत मुख्याध्यापक सतत गैरहजर राहण्याचे गंभीर परिणाम आता उघड होत आहेत. शाळेचे शैक्षणिक आणि प्रशासनिक कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले असून विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये यामुळे तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

मुख्याध्यापक गेल्या अनेक महिन्यापासून शाळेत सातत्याने उपस्थित नसल्याने शाळेतील सर्व जबाबदाऱ्या शिक्षकांवरच पडत आहेत. नियमित तासिका विस्कळीत होत असून, अध्यापनातील सातत्य कोलमडले आहे. शाळेतील शिस्त, विद्यार्थ्यांची उपस्थिती, प्रशासनिक नोंदी, शैक्षणिक तपासण्या तसेच महत्त्वाची कामे या सर्वांवर याचा प्रतिकूल परिणाम जाणवत आहे.

पालकांच्या मते मुख्याध्यापकांच्या गैरहजेरीमुळे शाळेतील नियंत्रण व्यवस्था ठप्प झाली असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर थेट परिणाम होत आहे. काही पालकांनी तर आपल्या मुलांचे भवितव्य धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांनीही ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन शिक्षण विभागाचे तातडीने लक्ष वेधले आहे. जबाबदार अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन परिस्थितीची तात्काळ पाहणी करावी, मुख्याध्यापकांच्या अनुपस्थितीमागील कारणे शोधावीत आणि आवश्यक ती कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी करण्यात येत आहे.

“मुख्याध्यापकच शाळेत अनुपस्थित राहणार तर शाळा सुरळीत कशी चालणार?” असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी या समस्येवर ताबडतोब कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.