Home Breaking News अतिवृष्टीग्रस्त मदत पॅकेजमध्ये गोंडपिपरी तालुक्याचा अखेर समावेश!…

अतिवृष्टीग्रस्त मदत पॅकेजमध्ये गोंडपिपरी तालुक्याचा अखेर समावेश!…

229

प्रतिनिधी सिद्धार्थ दहागावकर

आमदार देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्याचे फलित; शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त..

गोंडपिपरी, दि. २९
सन २०२५ मध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळे बाधित झालेल्या गोंडपिपरी तालुक्याचा विशेष मदत पॅकेज अंतर्गत समावेश करण्यात आला आहे. आमदार देवराव भोंगळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांची दि. १३ आक्टोंबर रोजी निवेदन देत भेट घेतली. तसेच महसूलमंत्री ना. चंद्रशेखरजी बावनकुळे यांचीही दि. १३ आक्टोंबर रोजी केलेल्या तातडीच्या पत्रव्यवहारानंतर राज्य शासनाने काल (दि. २९) तसे सुधारित पत्रक जारी केले आहे.

राज्य शासनाने दि. ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी माहे जून ते सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज आणि सवलती घोषित करण्याचा मूळ शासन निर्णय (क्र.: सीएलएस-२०२५/प्र.क्र.३६५/म-३ (मदत-१)) काढला होता. या मूळ यादीत गोंडपिपरी तालुक्याचा समावेश करण्यात आला होता, ज्यामुळे स्थानिक शेतकरी बांधवांमध्ये नुकसानभरपाई मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या होत्या. परंतु, दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी काढण्यात आलेल्या सुधारित शासन निर्णयातून गोंडपिपरी तालुक्याला वगळण्यात आले होते. त्यामुळे गोंडपिपरीतील शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आणि असंतोष पसरला होता.

*आमदार देवराव भोंगळे यांचा लागलीच पाठपुरावा*

या गंभीर स्थितीची तातडीने दखल घेत, राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांची नागपुरात दि. १३ आक्टोंबर रोजी भेट घेऊन अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या सुधारित यादीत गोंडपिपरी तालुक्याचा समावेश करण्याची मागणी केली. त्याबरोबरच दि. १३ ऑक्टोबर रोजी राज्याचे महसूलमंत्री ना. चंद्रशेखरजी बावनकुळे यांना सविस्तर पत्रव्यवहार केला. तसेच राज्याचे मुख्य सचिव श्री. राजेश कुमार यांचीही दि. १४ आक्टोंबर रोजी भेट घेत पत्राद्वारे सकारात्मक कार्यवाहीची मागणी केली होती. त्यांनी पत्रात स्पष्ट केले की, गोंडपिपरी तालुका हा शेतीबहुल असून, वैनगंगा, वर्धा व अंधारी या प्रमुख नद्यांमुळे जून ते सप्टेंबर २०२५ या काळात तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे पीक व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

आमदार भोंगळे यांनी दिवाळीच्या सुट्ट्या संपताच काल (दि. २८) मुंबई गाठून मंत्रालयात राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, महसूलमंत्री ना. चंद्रशेखरजी बावनकुळे तसेच राज्याचे मुख्य सचिव श्री. राजेश कुमार यांची भेट घेऊन शेतकरी हिताच्या या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी तातडीने लक्ष घालून, सुधारित शासन निर्णयात दुरुस्ती करावी आणि गोंडपिपरी तालुक्याचा समावेश पुन्हा बाधित तालुक्यांच्या यादीत करण्याची विनंती केली होती. त्यांच्या मागणीची सकारात्मक दखल घेत, महसूलमंत्री ना. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या. त्यानुसार, राज्य शासनाने काल तसे सुधारित पत्रक (शासन निर्णय समक्रमांकित दिनांक १०/१०/२०२५) काढून सन २०२५ मधील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे सवलतीसाठी बाधित तालुके घोषित करण्याच्या यादीत गोंडपिपरी तालुक्याचा समावेश केला आहे.

या निर्णयामुळे गोंडपिपरी तालुक्यातील हजारो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेज आणि सवलतीचा लाभ मिळणार असून, त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. या दिलासादायक निर्णयाबद्दल तालुक्यातील शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त करीत आमदार देवराव भोंगळे यांचे आभार मानले आहेत.

Don`t copy text!