शासनाने सुधारित आदेशात मुल तालुका केला समाविष्ट; अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार दिलासा…

78

संपादक :- प्रशांत बिट्टूरवार

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेला शब्द केला पूर्ण

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी व पूरग्रस्त मदतीचा लाभ

अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाच्या दिलासादायक सवलती

चंद्रपूर : राज्य शासनाने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष मदत व सवलतींचे पॅकेज जाहीर केले होते. प्रारंभी या आदेशात चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुका समाविष्ट नव्हता. ही बाब लक्षात येताच आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्यांच्या तातडीच्या प्रयत्नांनंतर केवळ काही तासांतच शासनाने सुधारणा करून १० ऑक्टोबर रोजी नवीन शासनादेश काढत मुल तालुक्याचाही समावेश केला आहे. या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आ. मुनगंटीवार यांनी दिलेला शब्द काही तासांतच पूर्ण करून पुन्हा एकदा शेतकऱ्यांप्रती आपली संवेदनशीलता दाखवून दिली आहे.

आ. मुनगंटीवार यांच्या संवेदनशीलतेमुळे आणि कार्यतत्परतेमुळे मुल तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरली आहे. मुल,पोंभुर्णा , बल्लारपूर, चंद्रपूर तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या विशेष मदत पॅकेजचा थेट लाभ मिळणार आहे.

राज्य शासनाने जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात सवलती जाहीर केल्या आहेत. शासन आदेशानुसार जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जांच्या वसुलीला एक वर्षाची स्थगिती, वीज बिलात तिमाही माफी तसेच दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क व शैक्षणिक फीमध्ये माफी अशा अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.यासोबतच खरीप हंगाम जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरींचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घरांची पडझड, घरातील साहित्याचे नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. यासाठी नुकसान भरपाई शासनाकडून दिली जाणार आहे.

राज्यभरातील विविध तालुक्यांप्रमाणेच आता मुल तालुकाही आपत्तीग्रस्त घोषित करण्यात आला असून,या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. शासन आदेशात स्पष्ट नमूद केल्याप्रमाणे या सवलतींचा थेट लाभ चंद्रपूर जिल्ह्यासोबतच मुल तालुक्यातील शेतकऱ्यांनाही मिळणार आहे.

ही सकारात्मक घडामोड म्हणजे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत झटत राहणे हीच त्यांची कार्यसंस्कृती असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या निर्णयाबद्दल शेतकरी बांधवांकडून आ. मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.