बळीराम काळे, जिवती
जिवती (ता.प्र) : विदर्भ महाविद्यालय, जिवती येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत विशेष शासकीय सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचे थेट लाभ देण्यात आले. कार्यक्रमास आमदार देवराव भोंगळे, नगरपंचायत अध्यक्षा अनुसया राठोड, उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, तहसीलदार रुपाली मोगरकर, गटविकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके, तालुका कृषी अधिकारी माधुरी गावडे, तालुका आरोग्य अधिकारी स्वप्नील टेंभे यांचेसह विविध पक्षांचे पदाधिकारी, सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक प्रमाणपत्रांचे वाटप, भूमी अभिलेख विभागामार्फत शेतकऱ्यांना सनद वितरण, अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून नवीन रेशन कार्डचे वाटप, शेती यंत्रसामग्री योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना रोटावेटरचे वाटप, संगायो योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची DLC प्रक्रिया पूर्ण, गर्भवती व नवजात बालकांसाठी बेबी केअर किट वाटप, उमेद योजनेअंतर्गत स्वयंरोजगारासाठी ₹4.5 लाख व ₹2.5 लाखांचे धनादेश वितरण, आरोग्य विभागामार्फत मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरात एकूण 478 रुग्णांची तपासणी, ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत प्रमाणपत्र वाटप, यूआयडीएआय अंतर्गत 96 नागरिकांची आधार कार्ड अद्ययावतकरण आदी सेवा प्रदान करण्यात आल्या.
या अभियानामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना प्रशासनाच्या विविध योजनांचा व सेवा सुविधांचा थेट लाभ मिळाला. नागरिकांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.







