लोकशाही, कल्याणकारी राज्यात बदलण्यासाठी मतदार जागृत असावा -प्रा. डॉ. हितेंद्र धोटे…

116

प्रतिनिधी सतीश कुसराम

देसाईगंज:

लोकशाही ही आपल्या देशाची शान आहे. ती टिकविण्यासाठी प्रत्येक नगारीकाने जागृत, जबाबदार आणि सक्रिय राहिले पाहिजे. फक्त निवडणूकीत मतदान करून भागत नाही तर निवडलेल्या प्रतिनिधिकडे लक्ष ठेवणे, त्यांना विचारणे आणि गरज पडल्यास त्यांना पुढील वेळी बदलणे हे खरे लोकशाहीचे स्वरूप आहे. परंतु वास्तवात लोकशाही केवळ राजकीय दृष्ट्या प्रस्थापित झालेली दिसते. लोकशाही व्यवस्था कल्याणकारी राज्यात बदलविण्यासाठी मतदार जागृत होने व नेत्यामध्ये राष्ट्राभिमान असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन इंग्रजी विभाग प्रमुख तथा आय. क्यू. ए. सी. चे समन्वयक प्रा. डॉ. हितेंद्र धोटे यांनी केले. स्थानिक नू. शि. प्र. मंडळ द्वारा संचालित आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देसाईगंज येथे राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कार्यक्रम व राज्यशास्त्र विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना नुकतीच करण्यात आली. यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.


कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून प्रा. जितेंद्र राऊत, प्रा. अमोल बोरकर, प्रा. अनित होळी आदी प्रमुख्याने उपस्थित होते. विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ हितेंद्र धोटे पुढे म्हणाले की, “शाळा आणि महाविदयालय केवळ ज्ञान देणारे केंद्र नसून लोकशाही मूल्याची प्राथमिक पाठशाळा असावी. शिक्षणाच्या अभावामुळे लोकशाहीचे खरे स्वरूप अनेकांना समजले नाही.”
मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रा. जितेंद्र राउत म्हणाले की “लोकशाही ही केवळ सत्तेची रचना नाही, तर समानता, स्वातंत्र्य आणि न्यायाने भरलेली जीवनशैली आहे. ती मतपेटी पुरतीच मर्यादीत नसून प्रत्येकाच्या विचारात, वर्तनात आणि दैनंदिन जीवनात प्रकट झाली पाहिजे. खरी लोकशाही म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आणि इतरानाही तोच हक्क मान्य करणे होय, असे प्रतिपादन प्रा. जितेंद्र राउत यांनी केले.
कार्यक्रमाच्या अगोदर लोकशाही, लोकांसाठी, लोकांद्वारे या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली त्यानंतर राज्यशास्त्र विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन बी.ए. भाग 3 ची विद्यार्थीनी कु. पायल बांबोळे हिने केले. प्रास्ताविकात प्रा. प्रियंका ठाकरे यांनी विदयार्थी अभ्यास मंडळ स्थापण्याच्या उद्‌देशावर प्रकाश टाकला व नाविन्यपूर्ण उपक्रम पुढे यावेत अशी अपेशा व्यक्त केली. आभार प्रा.अमित मलगाम यांनी मानले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.