चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान, सरसकट नुकसान भरपाईची मागणी…

170

प्रतिनिधी गौरव मोहबे

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

खासदार प्रतिभा धानोरकर यांचे कृषी मंत्र्यांना पत्र

चंद्रपूर: मागील महिनाभर चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कृषी मंत्र्यांना पत्र पाठवून, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

पत्रात नमूद केल्यानुसार, जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन पिकावर खोडकूज, मूळकुज आणि यलो व्हेन मोझॅक यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे, ज्यामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील ३७९ गावांमध्ये जवळपास २२,४३८ शेतकऱ्यांचे १५,६८३.२० हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पीक बाधित झाले आहे. यापैकी १०,९००.२० हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे नमूद आहे.

सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले असून, पिके पिवळी पडली आहेत. पत्रात, या नुकसानीचे पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई देण्याची विनंती करण्यात आली आहे.

या सर्व बाबी लक्षात घेऊन, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याची मागणी कृषी मंत्र्यांकडे केली आहे.