कविवर्य ना.धों.महानोर साहित्य पुरस्कार अविनाश पोईनकर यांना जाहीर…

135

शरद पवारांच्या हस्ते २६ सप्टेंबरला मुंबईत गौरव

प्रतिनिधी सिद्धार्थ दहागावकर

चंद्रपूर :

यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई व भवरलाल अन्ड कांताबाई जैन फौंडेशन जळगाव यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्काराची घोषणा खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतीच केली. यात चंद्रपूर येथील प्रसिद्ध युवा कवी, सामाजिक संशोधक व कार्यकर्ते अविनाश पोईनकर यांना कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण काम करत योगदान देणाऱ्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. रोख २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अशोक जैन, डॉ. जब्बार पटेल, डॉ. प्रज्ञा दया पवार, डॉ. नितीन रिंढे, शंभू पाटील, अजित भुरे, रमेश जाधव आदींच्या निवड समितीने अविनाश पोईनकर यांची निवड केली आहे. राज्यभरातील साहित्य क्षेत्रातील कार्याचा सखोल आढावा घेऊन ही निवड करण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे सेंटरचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या हस्ते २६ सप्टेंबरला मुंबईत पोईनकर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

अविनाश पोईनकर यांचा लोकवाड्मय गृह प्रकाशित ‘दंडकारुण्य’ हा कवितासंग्रह राज्यभर चर्चेत आहे. साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानातून प्रकाशित ‘उजेड मागणारी आसवे’ हा कवितासंग्रह, ‘प्रा.विमल गाडेकर : व्यक्ती आणि वाड्मय’ हा संपादन ग्रंथ व ‘सुरजागड : विकास की विस्थापन?’ हा सामाजिक संशोधन ग्रंथ प्रकाशित आहे. चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांवर कृतीयुक्त काम आणि वास्तव लेखन ते करतात. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून साहित्य व समाजकार्य क्षेत्राचे लक्ष वेधले आहे.