ब्रम्हपूरीतुन अधिकाअधिक अधिकारी घडावे यासाठी मी सदैव प्रयत्नशील- आमदार विजय वडेट्टीवार…

71

संपादक प्रशांत बिट्टूरवार

*गणेशोत्सवात विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वितरण कार्यक्रम*

ब्रम्हपूरी नगरीला शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाते. या क्षेत्राचा एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून या क्षेत्रात सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक आरोग्य व समाजकार्याचा वारसा पुढे नेत क्षेत्रातील जनतेसाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता सर्वोतोपरी प्रयत्न मी करत असतो. विद्यार्थ्यानी आपले उज्वल भविष्य घडविण्यासाठी केवळ नशीबावर अवलंबून न राहता आपल्या कर्तृत्वाच्या बळावर यश संपादन करून प्रशासकीय अधिकारी व्हावे असे प्रतिपादन विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

ब्रम्हपूरीचा महाराजा गणेश उत्सव समितीच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त करिअर मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा पुस्तक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ नामदेव किरसान हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य डॉ देविदास जगनाडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, प्रदेश काँग्रेस सचिव डॉ थानेश्वर कायरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे हे होते. तर मुख्य मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील करिअर अड्डा अकॅडमीचे प्रा.आशिष ठेंगरी व प्रा.राहुल गाडगे हे होते.

पुढे बोलताना विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते, आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, विद्यार्थ्यांनी ज्ञानाची तिजोरी नेहमी भरून ठेवावी. ज्ञान असे धन आहे की ते चोरले जाऊ शकत नाही. ब्रम्हपूरी क्षेत्रातुन अधिकाअ़धिक प्रशासकीय अधिकारी घडावे याकरीता मी विशेष प्रयत्न करीत १० कोटी रुपये खर्च करून विद्यार्थ्यांसाठी ईलायब्ररी बांधण्यात आली आहे. याचा विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होणार आहे.

खासदार डॉ नामदेव किरसान बोलतांना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना सातत्य ठेवावे. अपयश आल्यानंतर खचून न जाता संयम ठेवून अभ्यास करावा. अपयश ही यशाची दुसरी पायरी असुन प्रयत्न ही यशाची चावी आहे. विद्यार्थ्यांनी परिस्थितीचे रडगाणे न गाता लढत राहावे असा मुलमंत्रही त्यांनी दिला. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचा संच वितरीत करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल मैंद यांनी केले. तर आभार सुरज मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला ब्रम्हपूरी, सिंदेवाही, सावली तालुक्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.