HomeBreaking Newsएक लाखाची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यांसह एकाला अटक...लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

एक लाखाची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यांसह एकाला अटक…लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

अवैधरित्या मुरूम उत्खनन आणि वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा न दाखल करण्यासाठी एक लाख रुपये घेताना पंढरपूर तालुक्यातील तुंगत गावचे मंडल अधिकारी रणजीत मोरे यांच्यासह साहेबांचा वसूलदार म्हणून चर्चेत असलेला खाजगी इसम शरद मोरे यांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. या सापळ्यातून मात्र एक बडा मासा निसटल्याची चर्चा आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार व्यक्तीने भाड्याच्या जेसीबीच्या सहाय्याने मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन केले होते. तसेच स्वतःच्या टिप्पर मधून वाहतूक देखील केली होती. यावर मंडल अधिकारी रणजीत मोरे यांनी कारवाईचा बडगा उभारला होता. याप्रकरणी गुन्हा नोंद न करण्यासाठी रणजीत मोरे यांनी खाजगी व्यक्ती शरद मोरे (रा. मुंडेवाडी तालुका पंढरपूर) यांच्यामार्फत तब्बल एक लाख रुपयाची लाच मागितली होती. जेसीबी आणि टिप्पर वर कारवाई न करणे, गुन्हा दाखल न करणे यासाठी एक लाख रुपये द्यायचे ठरले. दरम्यान संबंधित व्यक्तीने लाच लुचपत विभागाकडे तक्रार दिली. आज शुक्रवारी एक लाख रुपयाची लाच स्वीकारताना खाजगी व्यक्ती शरद मोरे आणि मंडल अधिकारी रणजीत मोरे यांना लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.

तब्बल एक लाख रुपयाची लाच घेताना मंडल अधिकाऱ्याला पकडल्यामुळे पंढरपूर महसूल विभागात एकच खळबळ माजली आहे. अवैध वाळू उपसा, बेकायदेशीर खडी क्रशर मुळे पंढरपूर तहसील कार्यालय चर्चेत आहे. अशा वातावरणातच तब्बल एक लाख रुपये घेताना मंडल अधिकारी आणि खाजगी व्यक्ती सापडल्याने कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

लाचेची रक्कम पाहता यामध्ये आणखी कोण सामील आहे का? याची चौकशी लाचलुचपत विभागामार्फत सुरू आहे.

मंडल अधिकारी रणजीत मोरे आणि आणि सहा ते सात वर्षे झाले साहेबांचा माणूस म्हणून तहसील कार्यालयामध्ये वावर असलेल्या शरद मोरे यांच्या संपत्तीची सखोल चौकशी करण्याची मागणी आता पंढरपूरकरांच्या वतीने केली जात आहे. हा खाजगी व्यक्ती मागील दोन ते तीन साहेबांचा खास असल्याची चर्चा तहसील वर्तुळात सुरू आहे. याच्या दादागिरीला महसूल कर्मचारी देखील वैतागल्याची माहिती पुढे येत आहे.

सदरचा यशस्वी सापळा लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार सोनवणे, पोलीस नाईक प्रमोद पकाले, पोलीस नाईक अतुल घाडगे, पोलीस कॉन्स्टेबल ल सतरके यांच्या पथकाने केली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!