Homeवाशीमशेतकऱ्यांनो ! पेरणीची घाई करु नका... 80 ते 100 मीमी. पाऊस...

शेतकऱ्यांनो ! पेरणीची घाई करु नका… 80 ते 100 मीमी. पाऊस पडल्यावरच पेरणी करा… कृषी विभागाचे आवाहन

रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी)

वाशिम: यंदाच्या खरीप हंगामात 13 जूनपासून पावसाला सुरुवात झाली आहे. 16 जूनपर्यंत वाशिम तालुक्यातील राजगाव महसुल मंडळात 78.9 मिमी, वारला मंडळात 75 मिमी, केकतउमरा मंडळात 105.8 मीमी, रिठद महसूल मंडळात 134.6 मीमी, कवठा महसुल मंडळात 135.9 मीमी. पाऊस पडला आहे. या महसुल मंडळात पेरणी योग्य पाऊस पडल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी पेरणी सुरु केली होती. 17 जूनपर्यंत मंगरुळपीर तालुक्यातील शेलु महसुल मंडळात 70.1 मीमी, धानोरा महसुल मंडळात 73.1 मीमी., मानोरा तालुक्यातील मानोरा महसुल मंडळात 96.9 मीमी, गिरोली महसुल मंडळात 72.5 मीमी, उमरी महसुल मंडळात 84 मीमी. पावसाची नोंद झाली आहे. या भागात जेमतेम पाऊस पडलेला असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. 26 जून अखेर वाशिम तालुक्यात 82.2 मीमी. रिसोड तालुक्यात 139.2 मीमी, मालेगांव तालुक्यात 86.8 मीमी, मंगरुळपीर तालुक्यात 94.6 मीमी, मानोरा तालुक्यात 96.4 मीमी आणि कारंजा तालुक्यात 55.7 मीमी. पावसाची नोंद झाली आहे. एकंदरीत 45 ते 50 टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. पावसाची आकडेवारी ही 46 महसुल मंडळात स्थापित करण्यात आलेल्या महावेध या पर्जन्यमापकावरुन घेण्यात आलेली आहे. सध्या पडणारा पाऊस हा सर्वत्र सारख्या प्रमाणात पडत नसून सर्व शेतकरी बांधवानी प्रत्यक्ष शेतात जाऊन जमीन 4 ते 6 इंच खोलीपर्यंत ओल झाल्याची व पेरणी योग्य ओलावा असल्याची खात्री करुनच पेरणी करावी.

पेरणी झालेल्या भागामध्ये तसेच पेरणी न झालेल्या भागामध्ये सद्यस्थितीत चांगल्या पावसाची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीमध्ये पेरणी व पिकाबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे. अशा ठिकाणी पीक उगवणी नंतर हलके संरक्षित ओलीत करावे. तसेच उगणीनंतर जमीनीमध्ये ओलावा टिकून राहण्याच्या दृष्टीने व किडीचा प्रादुर्भाव कमी होण्याकरीता पीक 15 दिवसाचे झाल्यानंतर डवरणीची व इतर आंतर मशागतीची कामे करावी. ज्या भागामध्ये पुरेसा पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. अशा शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, जेणेकरुन दुबार पेरणीचे संकट येणार नाही. 80 ते 100 मीमी. पाऊस पडलेला असतांना किंवा जमीनीमध्ये 4 ते 6 इंच ओलावा गेलेला असतांना किंवा जमीनीमध्ये टिचभर ते इतभर ओलावा गेलेला असतांना पेरणी करावी.

पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये ओलावा पुरेसा नसल्यामुळे शेतकऱ्यांनी उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी टाळावी तसेच ज्या शेतकऱ्यांच्या शेतावर पीक उगवून आलेले आहे. पंरतू शेतात पुरेसा ओलावा उपलब्ध नसल्यास ज्यांनी उगवणीपुर्व तणनाशक फवारलेले नाही असे शेतकरी उगवणीनंतर तणनाशक फवारणीची घाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तणनाशकाची फवारणी करतांना जमीनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करुनच फवारणी करावी. अन्यथा तणनाशकावर केलेला खर्च वाया जाऊन पिकाच्या वाढीवर सुध्दा अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता आहे. असे आवाहन जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवाना कृषि संशोधन केंद्र वाशिमचे शास्त्रज्ञ प्रा. डॉ. भरत गिते व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!