HomeBreaking Newsअबब ! 5 दिवसात 75 किलोमीटर रस्ता !! जागतिक विक्रमाने दशकाची समस्या...

अबब ! 5 दिवसात 75 किलोमीटर रस्ता !! जागतिक विक्रमाने दशकाची समस्या सुटणार ! नितीनजी आणि राजपथचे आभार

नितीनजी गडकरी यांनी लेह लडाख पासून कन्याकुमारी पर्यंत रस्ते कसे बांधले, हे आता देशवासियांना सांगणे काही नवे नाही. गडकरी म्हटलं की रोडकरी, गडकरी म्हणजे विकास, गडकरी म्हणजे असाध्य ते साध्य, गडकरी म्हणजे “आकांक्षांपुढती जेथ गगन ठेंगणे !”

देशाच्या कुठल्याही भागात जा, नितीनजींनी रस्त्यांचा कायापालट केला आहे. कर्णाच्या दातृत्वाने ते निधीची उधळण करतात आणि पाहता पाहता परिसराचा कायापालट होतो. जिथे प्रवास अशक्य होता तिथे काही तासात अंतर पार करता येईल, अशी किमया करण्याची त्यांची ताकद त्यांनी संपूर्ण देशात सिद्ध करून दाखवली आहे. थेट गंगोत्री, यमुनोत्री पर्यंत नितीनजींच्या अचाट कार्याची पावती लोक मुक्तकंठाने देतात.
पण…..! एखाद्या शुभ्र श्वेत वस्त्रावर एखादा छोटासा डाग जसा खटकतो तसे एक शल्य नितीनजींच्या आवडत्या विदर्भातच होते. देशाचा चेहरा बदलवलेले नितीनजी अमरावती – अकोला मार्ग कधी दुरुस्त करणार, हा सामान्यजनांचा कायम प्रश्न होता. विदर्भात नितीनजींवर प्रेम करणाऱ्या लोकांना पक्ष वैगेरे आडवा येत नाही. त्यांच्या कर्तृत्वाचे व दातृत्वाचे लोक दिवाने आहेत. अमरावतीहून अकोल्याला जाताना हा रस्ता कधी पूर्ण होणार, या प्रश्नाची त्यांचीही माळ पूर्ण व्हायची.
2012 साली या चार पदरी रस्त्याचा कंत्राट एल अँड टी सारख्या नामांकित कंपनीला दिला गेला. तांत्रिक कारणे काहीही असोत काम पुढेच सरकत नव्हते. शेवटी या कंपनीने काम सोडून पळ काढला. 2014 साली केंद्रात नितीनजी मंत्री झाले पण अमरावती – अकोला महामार्गातील अडसर दूर होण्या ऐवजी वाढतच होते. हा मार्ग लवकर पूर्ण व्हावा म्हणून जुनं खरकटं सावरून पुन्हा निविदा काढली गेली. आय एल अँड एफ एस नामक कंपनीने कंत्राट घेतला. त्यांनी 2018 पर्यंत थातूर मातूर काम केले आणि पुन्हा रस्ता ठप्प झाला. शेवटी लोकांनी अमरावतीहून अकोल्याला जाण्यासाठी दर्यापूर मार्ग निवडला आणि या रस्त्याला रामराम ठोकला. सर्व वाहतूक दर्यापूर – लासुर – आपातापा मार्गे जाऊ लागली. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात कुठेच काही दोष आढळत नसतानाही एखादे उपकरण योग्य तो परिणाम देत नाही, त्या न आढळणाऱ्या दोषास ब्लॅक होल म्हणतात. तसा काहीसा ब्लॅक होल या कामात निर्माण झाला होता. 2021 ला या महामार्गाचे तुकडे पाडून अमरावती अकोला रस्त्याचा कंत्राट “राजपथ” ला दिला गेला. या वर्षभरात थोडेफार काम होताना दिसू लागले. 2012 ते 2022 तब्बल 10 वर्ष एखादा रस्ता होत नसेल तर लोकांचे वैतागणे स्वाभाविक होते. मंत्री निष्क्रिय असता तर लोकांनी ओरडणेही सोडून दिले असते.

पण आता खरंच या रस्त्याचे भाग्य उजळले आहे. दहा वर्षांपासून नासुर बनलेल्या या रस्त्यावरच एक जागतिक विक्रम होतो आहे. सबुरीका फल मिठा होता है ! नितीनजींच्या प्रतिमेला साजेसा हा विक्रम आहे. दहा वर्षांची ओरड केवळ पाच दिवसात थांबवण्याची ही भन्नाट योजना आहे. रखडलेला अमरावती अकोला रस्ता मार्गी लावण्यासाठी नितीनजींनी “राजपथ” कंपनीचे प्रमुख जगदीशजी कदम यांच्यावर जबाबदार दिली आणि कदम यांनी नितीनजींच्या कार्यशैलीला शोभेल असा विक्रमी उपक्रम हाती घेतला. फक्त पाच दिवसात 75 किलोमीटर रस्ता पूर्ण होणार आहे. गेल्या 48 तासातच अमरावती अकोला रस्त्याचे भाग्य फळफळले. जीवघेण्या खड्ड्यांच्या जागी पोटातील पाणी हलू न देणारा डांबराच्या आवरणाचा रस्ता आकाराला आला आहे. काल काही किलोमीटर बांधलेला रस्ता पाहिल्यावर बाजूला उभा असलेला एक ट्रक चालक म्हणाला, रस्ता तो मख्खन बन गया ! एकदम मख्खन !!

नितीनजींनी सोपवलेली जबाबदारी सार्थ ठरवायची हे जगदीशजी कदम यांनी मनावर घेतले. त्यातून एक जागतिक विक्रमाची कल्पना त्यांना सुचली आणि आता दहा वर्षे रखडलेल्या रस्त्याचे भाग्य केवळ पाच दिवसात उजळते आहे.
2019 साली कतार येथे अजबूल नामक कंपनीने सरकारी यंत्रणेचा वापर करत दहा दिवसांत 25.275 किलोमीटर बिट्यूमिनस काँक्रिट रोड आकाराला आणल्याचा विक्रम केला आहे. सलग दहा दिवस एकही क्षण न थांबता काम करण्याचा तो सर्वात मोठा विक्रम आहे. या विक्रमाला मागे टाकून नवा जागतिक विक्रम करण्याचा संकल्प राजपथ व जगदीशजी कदम यांनी केला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये हा विक्रम नोंदवला जाणार आहे. 3 सप्टेंबर ला सकाळी 7 वाजून 27 मिनिटांनी रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाला. अजस्त्र मशिनरी कामाला लागली आहे. युद्धस्तरावर कामाला प्रारंभ झाला आहे. चोवीस तास माणसं काम करता आहेत. पाच दिवसात 75 किलोमीटर सिंगल लेन रस्ता पूर्णत्वास जाणार आहे. यासाठी गिनीजची टीम आली आहे. एका क्षणाची उसंत नाही. विश्रांतीचे नाव नाही.
अशीच गती असली तर वर्षभरात चार पदरी रस्ता पण पूर्ण होईल. नितीनजींचे आणि जगदीशजी कदमांसह राजपथच्या संपूर्ण चमुचे होऊ घातलेल्या जागतिक विक्रमासाठी अभिनंदन आणि पश्चिम विदर्भातील लोकांकडून व प्रामुख्याने अमरावतीकर व अकोलेकरांकडून मनःपूर्वक आभार !
– शिवराय कुळकर्णी
प्रवक्ता, भाजपा, महाराष्ट्र

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!