नागपूर, ११ एप्रिल
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 6 एप्रिल ते 16 एप्रिल 2022 दरम्यान सामाजिक समता कार्यक्रम आयोजित करण्याचे शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आले असून ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 11 एप्रिल ते 14 एप्रिल 2022, या कालावधीत महात्मा ज्योतिबा फुले जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘फुले-आंबेडकर ग्रंथ प्रदर्शनी’ ग्रंथालय विभागाद्वारे आयोजित करण्यात आली. त्याचबरोबर महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार दालन’ या नावीन्यपूर्ण संकल्पनेची सुरुवात प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांच्या मार्गदर्शनात व कु. काजोल रोटेले, संचालिका, ग्राम उत्कर्ष शिक्षण संस्था, नागपूर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून कु. काजोल रोटेले, संचालिका, ग्राम उत्कर्ष शिक्षण संस्था, नागपूर तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार मेश्राम उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचनाने झाली. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. व्यंकटी नागरगोजे यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले व त्यांच्या काही ठळक कार्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख करून त्यांनी केलेल्या क्रांतिकारी समाजसुधारणा बद्दल अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली. त्याचबरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार दालनाची संकल्पना समजावून सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कल्पना सिद्धार्थ मुकुंदे, ग्रंथपाल, संविधान प्रास्ताविकेचे वाचन राजीव काथवटे व आभार प्रा. शालीनी तोरे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक-शिक्षकेतर व विद्यार्थी गण बहुसंख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.






