HomeBreaking Newsराज्याचे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार शेतकऱ्यांच्या बांध्यावर.. शेतकऱ्यांनो खचू...

राज्याचे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार शेतकऱ्यांच्या बांध्यावर.. शेतकऱ्यांनो खचू नका, पूर्ण मदत करू —पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार…

चंद्रपुर : गत आठवड्यात सावली तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या धानाचे नुकसान झाले आहे. वरच्या पावसामुळे हातात आलेले पीक गेले असले तरी शेतकऱ्यांनो खचू नका, असा धीर देत शासन पूर्णपणे तुमच्या पाठीशी असून कोणत्याही परिस्थितीत मदत करू, असा विश्वास राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी दिला.

सावली तालुक्यात नुकसान झालेल्या मुंडाळा, पाथरी, उसरपार (तुकूम), मंगरमेंढा, पालेबारसा, सायखेडा येथे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करतांना ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, सीडीसीसी बँकेचे संचालक संदीप गड्डमवार, पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार परिक्षित पाटील, गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाहीचे शास्त्रज्ञ डॉ. विनोद नागदेवते, स्नेहा वेलादी, सोनाली लोखंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले की, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पूर्ण वर्षभराचे बजेट कोलमडले आहे. सावली तालुक्यात जवळपास 35 गावांमध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. या भागात होणारा जय श्रीराम नावाचा धान 2500 ते 2700 रुपये प्रति क्विंटलने घेतला जातो. 5 एकरामध्ये शेतकऱ्याला एक ते सव्वा लाखाचे उत्पन्न मिळते. मात्र, हे लाख रुपयाचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. शेतकऱ्यांची ही व्यथा जाणून घेण्यासाठी व त्यांना मदत करण्यासाठी आठ ते दहा गावांना आज भेटी दिल्या.

शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू व त्यांच्या मदतीची आर्त हाक यावेळी दिसली. सरकार म्हणून आम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे आहोत. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश संपूर्ण प्रशासनाला दिले आहे. तसेच ज्वारी आणि चनाचा त्वरित पुरवठा करून रब्बी हंगामात शेतकऱ्यांना कसे सावरता येईल, हा आमचा प्रयत्न राहणार आहे. असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्र्यांनी मुंडाळा येथे रामदास वरखडे, पाथरी येथे मधुकर गायकवाड, उसरपार येथे काशीनाथ चौधरी, मंगळमेंढा येथे शालिकराम निसार, पालेबारसा येथे रमेश तिजारे तर सायखेडा येथे उद्धव टेंभुर्णे यांच्या शेतातील नुकसानग्रस्त धानाची पाहणी केली. तसेच परिसरातील मुक्तेश्वर मंगर, सुभाष तिवाड़े, रामदास घनदाटे, राजेन्द्र वाघरे, डेबूजी तिवाड़े आदि शेतकऱ्यांशी संवाद साधला.

◆ शेतकऱ्यांनी मांडली पालकमंत्र्यांसमोर व्यथा :
सायखेडा येथील 70 वर्षीय शेतकरी उद्धव टेंभुर्णे यांनी पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांना नुकसान झालेल्या धान पिकाची चरडी दाखवून आपली व्यथा मांडली. संपूर्ण आयुष्यात एवढा पाऊस कधीच बघितला नाही. आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहो. या पिकातून काहीच हाती लागणार नाही. शेतातील हलाखीची परिस्थिती पाहून झोप लागत नाही. त्यामुळे शासनाने आम्हाला मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!