खाद्य तेलाचे भाव पुन्हा वाढले; दर कमी होण्याची शक्यता कमी

0
48

नागपूर : पेट्रोल-डिझेलच्या सततच्या दरवाढीने नागरिक त्रासले असताना आता खाद्य तेलाच्या वाढत्या दराने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. तेलाच्या वाढत्या किमतीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

खाद्यतेलांचे भाव आटोक्यात आणण्यासाठी सरकारने देशांतर्गत बाजारात खाद्यतेल व्यापाऱ्यांना ३१ मार्च २०२२ पर्यंत तेल साठा करण्यावर मर्यादा आणली. त्यामुळे गेल्या आठवड्यात खाद्यतेलाच्या दरात प्रतिकिलो १५ रुपयांची घसरण झाली होती. मात्र, मागणी वाढल्याने पुन्हा दर वाढले आहेत. त्यामुळे तेल दर कमी झाल्याचा आनंद औटघटकेचा ठरल्याचे बोलले जाते.

सणासुदीच्या दिवसांत खाद्यतेलाची साठेबाजी करणाऱ्यांवर वचक बसेल, असे बोलले जात असताना भाव वाढत आहेत. दर नियंत्रणात आणण्यासाठी सप्टेंबर महिन्यात विक्रमी १२.६२ लाख टन पाम तेलाची आयात केली. यामुळे खाद्य तेलाच्या दरात प्रतिकिलो १५ रुपयांची घसरण झाली. त्यात अजून वाढ होण्यास सुरुवात झाली.

बाजारात सोयाबीनची आवक सुरू झाली. दर वाजवी असले तरी अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यातील सोयाबीनचे पीक हातचे गेले. काही जिल्ह्यात पीक चांगले असले तरी उतारा कमी आहे. दिवाळीनंतर खाद्य तेलाचे भाव कमी होतात. परंतु यंदा ही शक्यता कमीच असून, याबाबत काही भाष्य करणे घाईचे ठरेल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षभरात देशांतर्गत खाद्यतेलाचे दर ४६.१५ टक्के वाढले. देशात ४० टक्के तेलबियांचे उत्पादन होत असून, ६० टक्के खाद्य तेलाची आयात करावी लागते. गेल्या वर्षीच्या तुलनेत तेलाच्या दरात विक्रमी वाढ झाली असे नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले. सणासुदीच्या दिवसात बाजारात ग्राहकांची गर्दी वाढली असून, डाळीसह इतरही वस्तूंची मागणी वाढली आहे. मात्र, डाळीसह तांदूळ, गव्हाचे भाव स्थिर आहेत. राजस्थानमध्ये उडदाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने भाव वाढलेले आहेत.

कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले. काही जण रोजगाराच्या शोधात असताना दुसरीकडे शासकीय नोकरदार आणि खासगी नोकरदार दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात येत आहेत. कोरोनापूर्वी ग्राहक वस्तू खरेदी करीत असताना खिशाचा विचार करीत नव्हते आता मात्र त्याचा विचार करून वस्तूंची खरेदी केली जात असल्याचे शहा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here