HomeBreaking Newsचंद्रपुर मनपातील घोटाळ्याची चौकशी सुरू; भाजपच्या अडचणीत वाढ..

चंद्रपुर मनपातील घोटाळ्याची चौकशी सुरू; भाजपच्या अडचणीत वाढ..

चंद्रपूर : अधिकाऱ्यांना महापौर पतीची ठार मारण्याची धमकी, घोटाळ्यांचे आरोप, आमसभेतील गदारोळांनी सातत्याने चर्चेत असलेल्या चंद्रपूर महानगर पालिकेच्या मागे आणखी एक शुक्लकाष्ठ लागले आहे. आझाद बगीचा निविदा, घन कचरा संकलन कंत्राट तथा प्रसिद्धी निविदेतील घोळांची चंद्रपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे महानगर पालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. यासोबतच घनकचरा व्यवस्थापन, अमृत योजना आणि दोनशे कोटींच्या कामातील अनियमिततेचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागासोबतच मंत्रालयात तक्रार झाल्या आहे.

मनपा निवडणूक ऐन आठ महिन्यांवर येऊन ठेपली असताना चौकशीचा ससेमिरा लागल्याने भाजप समोरील अडचणी वाढणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महानगर पालिकेला व्हेंटीलेटर रुग्णवाहिकेची गरज असताना २४ लाख रुपयांचे प्रसिद्धीचे कंत्राट नागपूर येथील एका कंपनीला दिले. त्याच दरम्यान महापौरांनी स्वतःसाठी ११ लाखांची गाडी खरेदी केली. एवढ्यावरच प्रकरण थांबले नाही. मनपाच्या कोषातून अतिरिक्त सत्तर हजार रुपये खर्चून महापौरांच्या वाहनासाठी अतिविशिष्ट क्रमांक घेतला. यावरून सत्ताधारी भाजपवर विरोधक तुटून पडले. पक्षाची बदनामी झाली. दरम्यानच्या काळात भाजपचे महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या कोरोना रुग्णालयातील रुग्णांकडून अतिरिक्त वसुलीचे प्रकरण समोर आले.

चहूबाजूंनी पक्षाच्या अडचणी वाढत असतानाच आता आर्थिक गुन्हे शाखेने मनपातील घोटाळ्यांची चौकशी सुरू केली. कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी महानगर पालिकेतील अनेक घोटाळ्यांच्या तक्रारी केल्या होत्या. मनपाच्या हद्दीतील सर्वात मोठी आझाद बागेच्या चार कोटी रुपयांची निविदा साडेसहा कोटी रुपयांपर्यंत वाढविली आहे. कोरोनाच्या काळात शासनाने आर्थिक निर्बंध लादले असताना गरज नसताना २४ लाख रुपयांचे प्रसिद्धीचे काम नागपुरातील एका कंपनीला दिले. तसेच घनकचरा संकलन निविदेत सुद्धा घोळ झाल्याची तक्रार सुद्धा तिवारी यांनी केली होती.

आझाद बाग प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आपले बयाण नोंदविल्याची माहिती तक्रारकर्ते तिवारी यांनी दिली. सोबतच इतर तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी सुरू केली आहे. तसेच कॉंग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर, सुनिता लोढीया यांनीही कचरा घोटाळा, अमृत पाणी पुरवठा योजना तथा दोनशे कोटींच्या कामातील अनियमितता आदी प्रकरणाची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केले. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाताना मनपातील सत्ताधाऱ्यामागे चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे प्राप्त महानगर पालिकेच्या तक्रारींची चौकशी सुरू झाल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी सांगितले.

महानगर पालिका भ्रष्टाचारमुक्त – महापौर कंचर्लावार
महानगरपालिचे कारभार पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त आहे. त्यामुळे गैरव्यवहारी लोकांच्या पोटात दुखणे सुरू झाले आहे. शहरातील विकासकामे विरोधकांना झोंबू लागली आहेत. आगामी निवडणुकीत विरोधकांचा पराभव स्पष्ट दिसत असल्याने झोपमोड झाली आहे. म्हणूनच न घडलेल्या घटनांचा बाऊ करून प्रसिद्धीची भूक मिटविली जात आहे. त्यामुळे पुरावे नसताना बिनबुडाचे आरोप करू नये, असे उत्तर महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले आहे.

महापालिका स्थापन झाल्यापासून मागील सात वर्षे सुज्ञ नागरिकांनी भाजपच्या हाती सत्ता दिली. २९ जुलैच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसच्या नगरसेवकाने जो गोंधळ घातला. त्यामुळे राज्यात चंद्रपूर महानगरपालिकेची बदनामी झाली. सभेमध्ये पीठासीन अधिकारी असलेल्या महिला महापौरांसमोर अरेरावीची भाषा करणे, टेबल ठोकणे हा सभागृहाचा अवमान नव्हे काय. महिलांच्या सन्मानाच्या बाता मारणारे महिला महापौरांचा अवमान करतात. बेसावध असताना चालून आलेल्या नगरसेवकांकडून असुरक्षितता वाटल्याने मी आसनावरून उभी झाली, असे कंचर्लावार यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषद घेऊन उठसूठ निरर्थक टीका करणारे गटनेते स्वतः सभागृहात साक्षीदार असताना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वकीलपत्र घेत आहेत. यातून किती भागीदारी आणि टक्केवारी मिळतेय, हे स्पष्ट करावे. केवळ प्रसिद्धीसाठी घटनेच्या दोन दिवसांनी पत्रकार परिषद घेऊन बिनबुडाचे आरोप करणे, चुकीचे आहे, असे प्रसिद्धी पत्रकात महापौरांना म्हटले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!