सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्याने स्वतःच्या दोन मुलांवर झाडल्या गोळ्या…एकाचा मृत्यु तर दुसरा मुलगा जखमी…

922

प्रतिनिधी दिलीप सोनकांबळे
नवी मुंबई : पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्याने आपल्या दोन मुलांवर गोळ्या झाडत एकाचा खून केला आहे. तर दुसरा मुलगा जखमी झाला आहे. ऐरोली सेक्टर 2 मध्ये सदरचा प्रकार घडला असून वडीलांनीच मुलांना गोळ्या घातल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ऐरोली सेक्टर 2 मध्ये भगवान पाटील हे पोलीस खात्यातून निवृत्त झालेले अधिकारी राहत होते. शिघ्रकोपी असलेल्या भगवान पाटील यांच्या स्वभावाला कंटाळून त्यांची दोन्ही मुले वेगळी राहत होती. शिल्लक गोष्टींवरून भगवान पाटील घरातील बायको पोरांबरोबर भांडण काढत असल्याने त्यांना सर्वजन वैतागले होते. अखेर भगवान पाटील यांच्या स्वभावात काहीच फरक पडत नसल्याने त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्यापासून वेगळे राहण्यास सुरुवात केली होती.

गाडीचा इन्शुरन्स भरण्यासाठी मुलांनी वडील भगवान पाटील यांना सांगितले असता यावरून त्यांनी मुलांशी हुज्जत घातली होती. संध्याकाळी दोन्ही मुलांना त्यांनी घरे बोलवले होते. घरात इन्शुरन्स भरण्यावरून तिघांमध्ये बातचीत झाली असता शिघ्रकोपी असलेल्या भगवान पाटील यांना राग अनावर झाला. मुलगा विजय आणि सुजय यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी ऐकले नाही. स्वतःच्या संरक्षणासाठी असलेल्या रिव्हॉल्वरमधून भगवान पाटील याने पाच गोळ्या झाडल्या. यातील तीन गोळ्या विजय पाटील या मुलाच्या पोटात, खांद्यावर आणि हाताला लागल्या. तर दुसरा मुलगा सुजय पाटील याच्या अंगाला चिटकून गोळी निघून गेली.

विजय पाटील याला तीन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. घरातून बाहेर येताच तो रस्त्यावर पडल्याने त्याला त्वरीत ऐरोलीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. सुदैवाने दुसरा मुलगा सुजय पाटील याला गोळी चाटून गेली असल्याने त्याचा जीव वाचला. दरम्यान याप्रकरणी आरोपी वडील भगवान पाटील याला रबाले पोलिसांनी अटक केली आहे. कोणत्या कारणावरून सदरची घटना घडली याचा तपास रबाले पोलीस करीत आहेत.