ताडगावच्या आठवडी बाजारात गडचिरोली पोलिसांचे आरोग्यदूत अभियान; 61 नागरिकांची मोफत तपासणी
शहीद जवानांच्या बलिदानाची जनजागृती करत दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचवली आरोग्यसेवा
प्रतिनिधी रविंद सद्दमवार
गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मौजा ताडगाव येथील आठवडी बाजार परिसरात आज दि. 29 मे 2026 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली व जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
अतिदुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे व आरोग्याविषयी जनजागृती करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात पोलीस रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल मडावी व डॉ. श्रेया कुमरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या आरोग्य शिबिरात पोस्टे ताडगाव हद्दीतील एकूण 61 नागरिकांची विविध आजारांबाबत तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार नागरिकांना मोफत औषधांचे वितरण करण्यात आले तसेच पोषण समस्या व विविध आजारांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गंभीर उपचारांची आवश्यकता असलेल्या 03 नागरिकांना पुढील तपासणीसाठी विविध रुग्णालयांकडे शिफारस करण्यात आली.
गडचिरोली पोलीस दलाकडून सन 2021 पासून आतापर्यंत 201 आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून सुमारे 42 हजार 500 हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच 05 रक्तदान शिबिरांतून 4 हजार 361 युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे. “ऑपरेशन रोशनी” अंतर्गत 9 हजार 971 पेक्षा अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करून 1 हजार 412 नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
आरोग्य शिबिरादरम्यान आठवडी बाजारात फिरत्या प्रदर्शनीच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असताना शहीद झालेल्या जवानांचे बलिदान, सी-60 जवानांचे शौर्य आणि पोलीस दलाच्या विविध नागरी कृती उपक्रमांची माहिती नागरिकांना देण्यात आली. विविध बॅनरद्वारे जनजागृती करत पोलिसांबद्दल सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.
सदर उपक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गडचिरोली श्री. सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. हर्षवर्धन बी.जे., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे ताडगावचे पोउपनि. कार्तिक दळवी व पोलीस अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडले.







