Home Breaking News महामार्गावर मोठे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प; वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा…

महामार्गावर मोठे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प; वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा…

44

महामार्गावर मोठे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प; वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा

प्रतिनिधी रवींद्र सद्दमवार

गडचिरोली : आलापल्ली ते भामरागड मुख्य राष्ट्रीय महामार्गावरील चंद्रा गावाजवळ आज सकाळी एक मोठे झाड अचानक रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. झाड थेट रस्त्याच्या मधोमध पडल्यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

या मुख्य मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी तसेच मालवाहतूक होत असते. मात्र झाड कोसळल्याने अनेक प्रवासी वाहने, मालवाहू ट्रक आणि इतर जड वाहने रस्त्यातच अडकून पडली आहेत. त्यामुळे चालक व प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी वनविभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत कळविले आहे. तात्काळ यंत्रणा पाठवून रस्त्यावरील झाड हटवून वाहतूक पूर्ववत करावी, अशी मागणी अडकून पडलेल्या प्रवासी व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

दुपारपर्यंत झाड हटवण्यात आले नाही तर कडक उन्हामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Don`t copy text!