ऑपरेशन अंतिम प्रहार : गडचिरोली-नारायणपूर पोलिसांची मोठी कारवाई ; माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त
जंगलात लपवून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा जप्त ; इन्सास रायफल, आयईडी स्फोटके, क्लेमोरसह शस्त्रनिर्मिती साहित्य नष्ट
जिल्हा संपादक नितेश खडसे
गडचिरोली : गडचिरोली पोलीस व नारायणपूर (छ.ग.) पोलिसांनी संयुक्त आंतरराज्यीय अभियान राबवत माओवाद्यांचा शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना उद्ध्वस्त करण्यात मोठे यश मिळविले आहे. आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या “ऑपरेशन अंतिम प्रहार” अंतर्गत जंगल परिसरात लपवून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा आणि शस्त्रनिर्मिती साहित्य जप्त करण्यात आले.
या कारवाईत 01 इन्सास रायफल, 02 सिंगल शॉट रायफल, 02 बारा बोअर रायफल आणि एकूण 18 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. तसेच 25 किलो आयईडी स्फोटक, 02 क्लेमोर, 110 डेटोनेटर, कॉर्टेक्स वायर, 500 हून अधिक बीजीएल सेल, 07 बीजीएल लाँचर, 03 ट्यूब लाँचर, लेथ मशीन, मोटर, ग्राइंडर मशीन, इन्व्हर्टर, बॅटरी, सोलर प्लेट आणि शस्त्रनिर्मितीसाठी लागणारे इतर साहित्यही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, पोस्टे काकूर, जि. नारायणपूर (छ.ग.) पासून सुमारे 07 किलोमीटर अंतरावरील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगतच्या दुर्गम जंगल परिसरात माओवाद्यांनी हे साहित्य जमिनीत लपवून ठेवले होते. सुरक्षा दलांवर घातपात करण्यासाठी व नक्षल सप्ताह, निवडणुका आदी काळात हल्ले घडवून आणण्यासाठी या साहित्याचा वापर केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
दिनांक 26 मे 2026 रोजी पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक प्राणहिता, बीडीडीएस प्राणहिता आणि डीआरजी नारायणपूर यांच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली. दिनांक 27 मे रोजी जंगल परिसरात कसून तपासणीदरम्यान हा शस्त्रसाठा उघडकीस आला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळीच माओवादी शस्त्रनिर्मिती साहित्य नष्ट करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक श्री. कार्तिक मधिरा, श्री. गोकुल राज जी., अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक श्री. हर्षवर्धन बी. जे., पोलीस उपअधीक्षक श्री. विशाल नागरगोजे आणि नारायणपूरचे पोलीस उपअधीक्षक श्री. मनोज मंडावी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली. या धाडसी कारवाईबद्दल सहभागी जवानांचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले आहे.







