माओवाद्यांचा गुप्त शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त
पोमकें-बिनागुंडा जंगलात पुरून ठेवलेले साहित्य गडचिरोली पोलिसांकडून नष्ट; आत्मसमर्पित माओवाद्यांच्या माहितीवर मोठी कारवाई

जिल्हा संपादक नितेश खडसे
गडचिरोली : जिल्ह्यातील माओवाद पूर्णतः संपविण्याच्या दिशेने गडचिरोली पोलिसांनी आणखी एक मोठे यश संपादन केले आहे. आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोमकें-बिनागुंडा जंगल परिसरात राबविण्यात आलेल्या विशेष शोध मोहिमेत माओवाद्यांचा गुप्त शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला असून, मोठ्या प्रमाणात शस्त्रनिर्मिती व स्फोटक साहित्य हस्तगत करून घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.

माओवादी शासनविरोधी कारवाया, नक्षल सप्ताह, निवडणुका तसेच सुरक्षा दलांवर घातपात करण्यासाठी जंगल परिसरात जमिनीत गुप्तपणे शस्त्रे व स्फोटक साहित्य लपवून ठेवत असत. याच पार्श्वभूमीवर ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत दिनांक 16 मे 2026 रोजी आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान पोमकें-बिनागुंडा हद्दीतील जंगल परिसरात शस्त्रनिर्मिती व अन्य साहित्य लपवून ठेवल्याची माहिती समोर आली.
या माहितीच्या आधारे दिनांक 21 मे 2026 रोजी पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक गडचिरोली, प्राणहिता यांच्या संयुक्त सहा तुकड्या तसेच बीडीडीएसची दोन पथके शोध मोहिमेसाठी रवाना करण्यात आली.

दिनांक 22 मे रोजी पोमकें-बिनागुंडाच्या उत्तरेकडील जंगल परिसरात घेरा घालून कसून तपासणी करण्यात आली. यावेळी जवानांना जंगलात पुरून ठेवलेले विविध साहित्य आढळून आले. यात लेथ मशीन, बीजीएल पाईप्स, 12 बोअर पाईप, इन्व्हर्टर, जनरेटर, बॅटरी, ग्राइंडिंग व ड्रिलिंग मशीन, जीग सॉ मशीन, प्रेशर पंप, सोलर पॅनल, 20 फुटांचा फुटबॉल पाईप आदी साहित्याचा समावेश होता.
मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळीच हे सर्व साहित्य जवानांच्या मदतीने नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे माओवाद्यांच्या भविष्यातील घातपाताच्या कारवायांना मोठा आळा बसणार असल्याचे मानले जात आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता व बीडीडीएसच्या जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली. पोलीस अधीक्षकांनी या धाडसी मोहिमेत सहभागी जवानांचे कौतुक केले आहे.







