Home Breaking News BSNL नेटवर्क फक्त नावाला ; प्रत्यक्षात गॅस बुकिंगसाठी मिस्ड कालही होईना! जिवती...

BSNL नेटवर्क फक्त नावाला ; प्रत्यक्षात गॅस बुकिंगसाठी मिस्ड कालही होईना! जिवती तालुक्यात गॅस बुकिंगसह डिजिटल सेवा ठप्प

322

BSNL नेटवर्क फक्त नावाला ; प्रत्यक्षात गॅस बुकिंगसाठी मिस्ड कालही होईना!

जिवती तालुक्यात गॅस बुकिंगसह डिजिटल सेवा ठप्प

प्रतिनिधी बळीराम काळे

जिवती (ता.प्र.) : तालुक्यातील अनेक गावांमध्ये BSNL चे नेटवर्क मागील आठवड्याभरापासून सतत खंडित होत असल्याने नागरिकांना तीव्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील येल्लापूर,माराईपाटण,लांबोरी, शेडवाही(भारी),कोदेपूर यांसह सुमारे ३५ ग्रामपंचायतींमध्ये BSNL ने टॉवर उभारले असले तरी प्रत्यक्षात सेवा सुरळीत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
माराईपाटण,येल्लापूर सह BSNL चे टॉवर नुकतेच सुरू करण्यात आले. सुरुवातीला सेवा समाधानकारक होती; मात्र गेल्या काही दिवसांत नेटवर्क वारंवार खंडित होत असून सिग्नल पूर्णपणे गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. एकदा नेटवर्क गेले की ते परत येण्यासाठी सहा ते आठ दिवस लागते. नेटवर्क आले तरी सिग्नल इतके कमकुवत असते की कॉल लागत नाहीत आणि इंटरनेट सेवा देखील ठप्प होते. अशी वास्तव स्थिती जिवतीसह गावागावातील आहे.
विशेष म्हणजे, तालुक्यातील ज्या ज्या मोबाईल वापरकर्ताकडे BSNL चे सिम आहेत त्यांना HP Gas च्या क्रमांकावर गॅस बुकिंगसाठी मिस्ड कॉल देतानाही अडचणी येत आहेत. OTP शिवाय गॅस देता येत नाही असे गॅस वितरक सांगत आहेत. आणि BSNL च्या अशा नेटवर्कच्या समस्येमुळे ग्राहकांना OTP मिळवण्यासाठी आवश्यक असलेला मिस्ड कॉल सुद्धा लागत नसल्याने नागरिकांना गॅस बुकिंग करता येत नाही. असाच प्रकार काल रात्री माराई पाटण, शेडवाही(भारी), येल्लापुर येथे अनेकांसोबत घडल्यामुळे येल्लापुर सह अनेक गावातील नागरिकांच्या दैनंदिन गरजांच्या सेवांवरही परिणाम झालेला दिसून येत आहे.
दरम्यान, नेटवर्क समस्येमुळे तालुक्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांचे कामकाजही प्रभावित झाले आहे. सेतू केंद्रातील विविध सेवा तसेच इतर डिजिटल सुविधा उपलब्ध असूनही नेटवर्कअभावी नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे. संबंधित विभागानी तातडीने लक्ष घालून BSNL चे नेटवर्क सुरळीत करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद मोहूर्ले यांनी केली आहे.

Don`t copy text!